- निधीवाटपात कोणत्याही विभागावर अन्याय नाही
ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी महाविकास आघाडीचे सरकार कटीबध्द असून विकासनिधीच्या वाटपात राज्याच्या कोणत्याही विभागावर अन्याय होऊ दिला जाणार नाही, अशी ग्वाही देत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘कारोना’ संकटाचा मुकाबला करण्यासाठी विरोधी पक्षांसह सर्व घटकांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेचा उत्तर देतांना, सदस्यांनी उपस्थित केलेल्या सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरे दिल्याबद्दल विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी उपमुख्यमंत्र्यांचे विशेष अभिनंदन केले.
विधानपरिषदेत राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, राज्यावर आलेल्या ‘कोरोना’च्या अभूतपूर्व संकटाचा सामना महाविकास आघाडी सरकारने अत्यंत धीराने आणि संयमाने मुकाबला केला. या लढ्यात राज्यातील डॉक्टर, नर्सेस, पॅरामेडीकल स्टाफ, पोलीस, सफाई कामगार, आशा वर्कर, अंगणवाडीताईंसह अत्यावश्यक सेवेतील सर्व कोरोनायोध्यांनी पहिल्या फळीत राहून, जोखीम पत्करुन लोकांचे जीव वाचवले.
लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्थांसह राज्यातल्या नागरिकांनी सरकारला समर्थपणे साथ दिली, त्यामुळेच राज्यातला कोरोना नियंत्रित राहू शकला, असे सांगत उपमुख्यमंत्र्यांनी या सर्वांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
राज्यावरील ‘कोरोना’चे संकट अद्याप पुर्णपणे संपलेले नाही. त्यामुळे या संकटाचा सामना करताना मास्कचा वापर करणे, वारंवार हात धुणे, सुरक्षित अंतर ठेवणे या त्रिसुत्रीचा वापर सर्वांनी कायम ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले.
राज्यात वैधानिक विकास मंडळे अस्तित्वात नसली तरी ही मंडळे अस्तित्वात आहेत असे गृहीत धरुन निधीचे वाटप ठरलेल्या सुत्रानुसारच करण्यात येईल. विदर्भ-मराठवाड्यासह उर्वरीत महाराष्ट्राच्या विकासासाठी सरकार कटीबद्ध असून राज्याच्या कोणत्याही विभागावर अन्याय होणार नाही याची काळजी घेण्यात येत आहे. ‘कोराना’मुळे राज्य आर्थिक अडचणींचा सामना करत असताना केंद्राकडे ‘जीएसटी’च्या परताव्याची 32 हजार कोटींची थकबाकी आहे, अशा संकटाच्या काळात केंद्र सरकारने ही थकबाकी तातडीने देण्याची अपेक्षा व्यक्त केली.









