स्पेनमधील आंतरराष्ट्रीय मुष्टियुद्ध स्पर्धा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
स्पेनमधील कॅस्टेलिनो येथे सुरू झालेल्या 35 व्या बॉक्सन आंतरराष्ट्रीय मुष्टियुद्ध स्पर्धेत भारताच्या मनीष कौशिकने 63 किलो वजन गटातील पहिल्या सामन्यात सहज विजय मिळवित उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला.
वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक मिळविलेल्या मनीषने स्पेनच्या अम्मारी रॅडुवेनवर 5-0 अशी एकतर्फी मात केली. उपांत्यपूर्व फेरीत त्याची लढत कझाकच्या सुफिउल्लिन झाकिरविरुद्ध होणार आहे. झाकिरने दोन वेळा आशियाई स्पर्धेत रौप्यपदक मिळविले आहे. राष्ट्रकुलमध्ये रौप्यपदक मिळविणारा कौशिक सुमारे वर्षभरानंतर रिंगमध्ये उतरला आहे. मागील वर्षी जॉर्डनमध्ये झालेल्या आशियाई पात्रता स्पर्धेत त्याने ऑलिम्पिकमधील स्थान निश्चित केले होते. या स्पर्धेसाठी भारताने 14 सदस्यीय पथक पाठविले असून त्यात आठ पुरुष व 6 महिलांचा समावेश आहे. त्यापैकी 9 जण ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेले खेळाडू आहेत. या सर्व 14 सदस्यांनी येथे उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले आहे.