टर्फ गेले निघून, मातीही होतेय कमी; छत्रपती शिवाजी स्टेडियमवरील मैदानाची दुरवस्था
नंदकुमार तेली / कोल्हापूर
राजर्षी शाहू महाराजांनी खेळाला राजाश्रय दिल्यामुळेच कोल्हापूरची क्रीडानगरी म्हणून ओळख निर्माण झाली. कुस्तीपाठोपाठ, फुटबॉल, क्रिकेटला लोकाश्रय म्हणून क्रीडानगरीत छत्रपती शिवाजी स्टेडियम उभारले गेले. या स्टेडियममधील हिरवळीवर रणजीसह आंतरराष्ट्रीय सामनेसुद्धा झाले. बहुसंख्य खेळाडूंनी स्टेडियममधील खेळपट्टी ही दर्जेदार असल्याची टिप्पणी देत स्टेडियमचा लौकिक वाढवला होता. मात्र आता या खेळपट्टीची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. या खेळपट्टयांवर फुटबॉलपटू बिनधास्तपणे फुटबॉल खेळतात. त्यामुळे खेळपट्टीवरील टर्फ तर निघून गेले आहेच, शिवाय मातीही रोज उडून जात असल्यामुळे खेळपट्ट्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, स्टेडियममध्ये क्रिकेट स्पर्धांच्या आयोजनास आयोजकांनी पाठ फिरवली आहे.
बॅरिकेट्सवरून उड्या मारून खेळपट्टीवर..
छत्रपती शिवाजी स्टेडियमच्या मैदानाच्या मधोमध तीन ते चार दर्जेदार खेळपट्ट्या आहेत. त्यांच्या सुरक्षिततेसाठी चोहोबाजूंनी बॅरिकेटस्ही असूनसुद्धा मुले बॅरिकेटस्वरून उड्या मारून खेळपट्टीवर जाऊन तासन् तास फुटबॉल खेळतात. खेळपट्टीवर खेळू नका, असे जर कोणी सांगायला गेल्यास त्यालाच ही मुले अपमानित करतात. मुले खेळपट्टी बिघडवत असल्याने तिच्यावरून रोलर फिरवणे बंद केले आहे. खेळपट्टीची देखभाल केली जात नसल्याने क्रिकेटपटूंमधून नाराजी व्यक्त होत आहे. जिल्हा क्रीडा संकुल समितीने खेळपट्टीवर खेळणार्या मुलांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी क्रिकेटपटूंची आहे.
स्टेडियमची प्रवेशव्दारे बनले लघुशंकेचे ठिकाण
स्टेडियमच्या तिन्ही बाजूंची प्रवेशद्वारे कायम बंद असल्यामुळे या प्रवेशद्वारांचा उपयोग लोकांनी लघुशंका करण्यासाठी केला आहे. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. दारुच्या बाटल्याही प्रवेशद्वावर पाहायला मिळत आहेत. मुख्य प्रवेशव्दाराची प्रचंड दुरवस्था झाली आहे.
मैदान क्रिकेटचे.. सराव फुटबॉलचा..!
फुटबॉल खेळण्यामुळे मैदानातील आऊटफिल्डचे गवतच नामशेष झाले आहे. मैदानाच्या विकासाकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे क्रिकेटच्या स्पर्धांनाही ब्रेक लागला आहे. सध्या याच मैदानावर फुटबॉलचा सराव जोरात सुरू आहे. काही क्रिकेट संघ मैदानावर सरावासाठी येतात. त्यांनी सरावासाठी स्वत:हून मैदानात खेळपट्ट्या तयार केल्या आहेत. या संघांच्या सोयीसाठी जिल्हा क्रिकेट असोसिएशनने स्टेडियमच्या पश्चिम बाजूला चार खेळपट्टया तयार केल्या आहेत. त्यांना लोखंडी बॅरिकेटस् लावले आहे. पण त्याचीही फुटबॉल खेळाडूंनी मोडतोड केली आहे. तसेच या खेळपट्टयांवरही बिनधास्तपणे फुटबॉल खेळला जात आहे.