उरलेले अन्नपदार्थ वाया घालवणं जीवावर येतं. मग असे पदार्थ फ्रीजमध्ये ठेऊन दुसर्या दिवशी खाल्ले जातात. श्रीखंड, बासुंदी, कढी, खीर या पदार्थांची लज्जत दुसर्या दिवशी अधिकच वाढते. मात्र काही पदार्थ शिळे झाल्यानंतर खाऊ नयेत. अशा पदार्थांमुळे आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. अशाच काही पदार्थांविषयी…
- शिळं अंडं खाणं टाळावं. शिळ्या अंडय़ात साल्मोनेला नामक जीवाणूची वाढ होऊ लागते. हा जीवाणू अनेक आजारांना कारणीभूत ठरतो. त्यामुळे उकडलेलं अंडं लगेच खावं.
- शिळे तेलकट पदार्थही खाऊ नयेत. भजी, पुरी, पॅटिस असे शिळे पदार्थ उरल्यावर दुसर्या दिवशी खाल्ले जातात. असे पदार्थ गरम केल्यानंतर जास्त कडक होतात. काही पदार्थांवर तेलाचा थर साचतो. असे पदार्थ खाणं हानिकारक मानलं जातं.
- उकडलेले बटाटे उरल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवत असाल तर सावध व्हा. शिळे बटाटे खाऊ नयेत. उकडलेले बटाटे बराच काळ ठेवल्यास ते आतून सडू लागतात. असे बटाटे खाल्ल्यामुळे पोट बिघडू शकतं.
- बीट खूपच लाभदायी आहे. शरीरात रक्ताची कमतरता असेल तर बीट खाण्याचा सल्ला दिला दिला जातो. मात्र बीट घातलेले पदार्थ शिळे झाल्यानंतर खाऊ नयेत. बीटयुक्त पदार्थ गरम केल्यानंतर त्यात अत्यंत घातक अशा नायट्रोसेमाइनची निर्मिती होऊ लागते. हा घटक आरोग्याला धोका उत्पन्न करू शकतो.









