ऑनलाईन टीम / कराची :
संयुक्त अरब अमिरातीतील (यूएई) शारजाहून लखनऊला येणाऱ्या इंडिगो एअरलाईन्सच्या विमानातील एका प्रवाशाची प्रकृती अचानक बिघडली. त्याला तात्काळ वैद्यकीय सेवा मिळावी म्हणून या विमानाचे पहाटे साडेपाच वाजता कराचीत इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. मात्र, तरीही या प्रवाशाचा जीव वाचला नाही.
लखनऊला जाणारे हे विमान पाकिस्तानी हवाई क्षेत्रात असताना एका प्रवाशाची प्रकृती खालावली. त्यानंतर विमानाच्या कॅप्टनने हवाई वाहतूक नियंत्रणाशी संपर्क साधून कराची विमानतळावर वैद्यकीय सेवेसाठी इमर्जन्सी लँडिंगची परवानगी मागितली. हे विमान पहाटे साडेपाच वाजता कराचीच्या जिना विमानतळावर उतरले.
कराची विमानतळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, प्रवासी हबीबूर रहमान (वय 67) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने विमानात निधन झाले होते. प्रवाशाच्या मृत्यूबाबत सर्व कायदेशीर कार्यवाही पूर्ण करून सकाळी 8.36 वाजता हे विमान भारताकडे रवाना झाले.