प्रतिनिधी / कुपवाड
कोविड-१९ अंतर्गत लसीकरणासाठी सांगली व मिरजेप्रमाणे कुपवाडकरांसाठी स्वतंत्र किमान तीन ठिकाणी कोविड लसीकरण केंद्र सुरु करा, अशी मागणी कुपवाड शहर संघर्ष समितीच्यावतीने आयुक्तांकडे करण्यात आली आहे. समितीचे अध्यक्ष सनी धोतरे, प्रकाश पाटील, प्रवीण कोकरे, सागर खोत, महेश निर्मळे, अनिल कवठेकर, प्रकाश व्हनकडे यांच्या शिष्टमंडळाने याबाबतच्या मागणीचे लेखी निवेदन आयुक्तांना दिले आहे.
सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेने कोविड-१९ अंतर्गत सांगली व मिरजेच्या बहुतांश ठिकाणी लसीकरण केंद्रे जाहिर केले आहेत. त्यामध्ये कुपवाड शहर व विस्तारित उपनगरातील नागरीकांसाठी एकही केंद्र समाविष्ट केले नाही. इंदिरानगर मिरज, अभयनगर, लक्ष्मीनगर येथे कोविड-१९ लसीकरणाची केंद्रे सुरु केले आहेत. त्याठिकाणी जावून लसीकरण करुन घेणे कुपवाड भागातील नागरीकांसाठी गैरसोयीचे होणार आहे. शहरातील ज्येष्ठ नागरीक, वृध्द महिला इतक्या लांब अंतरापर्यंत जावून कोविड-१९ लसीकरण करुन घेवू शकत नाहीत.
अहिल्यानगर ते गहमेंट कॉलनी, विजयनगर न्यायालय परिसर ते शरदनगर आणि बजरंगनगरपर्यंत कुपवाडचा विस्तारीत भाग आहे. त्यामुळे कुपवाडसाठी स्वतंत्र किमान दोन ते तीन कोविड लसीकरणाची केंद्रे होणे अत्यावश्यक आहे. कुपवाड येथील महानगरपालिका दवाखाना, अहिल्यानगर, शरदनगर व कुपवाड आदी विस्तारीत भागात तीन ठिकाणी कोविड लसीकरण केंद्रे तातडीने सुरु करावेत. मनपा प्रशासनाने याचा गांभिर्याने विचार करावा. अन्यथा, मनपा विरोधात कुपवाड शहर संघर्ष समितीच्यावतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा ईशारा संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.