दोन पोलीस स्थानकांच्या वादातून निवृत्त जवानाची फरफट, चोरी प्रकरणी फिर्याद घेण्यास टाळाटाळ
प्रतिनिधी / बेळगाव
महालक्ष्मीनगर, गणेशपूर येथील एका निवृत्त जवानाच्या घरी चोरीचा प्रकार घडला आहे. चोरटय़ांनी सुमारे 2 लाख रुपयांचा ऐवज पळविला असून पोलीस स्थानकाच्या हद्दीच्या वादामुळे चोरीच्या घटनेनंतर तब्बल 24 तासांहून अधिक काळ पोलिसांनी एफआयआर दाखल करुन घेण्यास टाळाटाळ केली आहे. त्यामुळे देशाच्या सीमेच्या रक्षणकर्त्याला सीमा हद्दीच्या वादातून नाहक त्रास सहन करावा लागला आहे.
प्रत्यक्षात रविवारी दुपारी 4 वाजता चोरीचा प्रकार उघडकीस आला असला तरी सोमवारी रात्री 9 वाजेपर्यंत या संबंधी एफआयआर दाखल झाला नव्हता. कॅम्प पोलिसांनी बेळगाव ग्रामीण पोलिसांकडे तर ग्रामीण पोलिसांनी कॅम्प पोलीस स्थानकाचा रस्ता दाखवत ज्यांच्या घरी चोरी झाली आहे त्या निवृत्त जवानाला चप्पल झिजवण्यास भाग पाडले आहे.
महालक्ष्मीनगर, गणेशपूर येथील जोतिबा अर्जुन पाटील या निवृत्त जवानाच्या घरी चोरीचा प्रकार घडला. रविवार दि. 28 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजता जोतिबा यांची पत्नी व मुलगा बाचीला गेले होते. तर त्यांची मुलगी क्लाससाठी बेळगावला आली होती.
घरात कोणीच नव्हते. दुपारी 4 वाजता कुटुंबातील एक जण घरी परतले असता चोरीचा प्रकार उघडकीस आला.
चोरटय़ांनी कडीकोयंडा तोडून अडीच तोळय़ाचे दागिने, अर्धा किलो चांदी, एक लॅपटॉप, 6 हजार रुपये रोख रक्कम असा सुमारे 2 लाखांचा ऐवज पळविला आहे. चोरीचा प्रकार उघडकीस येताच कॅम्प पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पाहणी केल्यानंतर हे घर कॅम्प पोलीस स्थानकाच्या हद्दीत येत नाही. तुम्ही बेळगाव ग्रामीण पोलिस स्थानकात जा, असा सल्ला देवून ते तेथून निघून गेले.
त्यानंतर जोतिबा व त्यांच्या कुटुंबीयांनी बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकाशी संपर्क साधला. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पाहणीनंतर हे घर आपल्या हद्दीत येत नाही, तुम्ही कॅम्प पोलिस स्थानकाकडे जा, असा सल्ला त्यांनी दिला. त्यावेळी पुन्हा कॅम्प पोलीसांशी संपर्क साधण्यात आला. बेळगाव ग्रामीण व कॅम्प दोन्ही पोलिसांनी चर्चा केली. हद्दीवरुन पोलिसांमध्ये वादावादी झाली व ते तेथून निघून गेले.
सोमवारी रात्रीपर्यंत या संबंधी एफआयआर दाखल झाला नव्हता. पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन यांच्या निदर्शनास हा प्रकार येताच त्यांनी यंत्रणा हलविली. लागलीच जोतिबा यांना कॅम्प पोलीस स्थानकातून फोन आला. तुमची फिर्याद स्वीकारण्यास आम्ही तयार आहोत, तुम्ही पोलीस स्थानकाकडे या, असा निरोप देण्यात आला. एकंदर प्रकार लक्षात घेता बेळगाव पोलीस दलात नेमकी काय परिस्थिती आहे, याची जाणिव होते.
हद्दीचा वाद नेहमीचाच…
एखाद्या घटनेनंतर कोणत्या पोलीस स्थानकात त्याची नोंद करावी, यावरुन हद्दीचा वाद सुरू होतो. त्यामुळे नागरिकांना मात्र नाहक मनस्ताप सहन करावा लागतो. त्यामुळे वरि÷ पोलीस अधिकाऱयांनी ‘तुमच्याकडे येणाऱयांची विचारपूस करून प्रथम एफआयआर दाखल करुन घ्या, नंतर ज्या हद्दीत ही घटना घडली आहे त्या संबंधित पोलीस स्थानकाकडे प्रकरण वर्ग करता येते.’ असा सल्ला वारंवार देवूनही हद्दीचा वाद संपता संपेना. अलिकडेच एका बेपत्ता प्रकरणात गुलबर्गा पोलिसांनी हद्दीच्या वादामुळे एफआयआर दाखल करुन घेण्यास टाळाटाळ केली होती. त्यामुळे उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने पोलीस निरीक्षकाला आठवडाभर पोलीस स्थानकासमोरचा रस्ता झाडण्याची शिक्षा दिली होती. ही घटना ताजी असतानाच हद्दीच्या वादावरुन चोरी प्रकरणी एफआयआर दाखल करुन घेण्यास टाळाटाळ करण्यात आली आहे. वरि÷ अधिकाऱयांच्या सूचनेनंतर कॅम्प पोलीस स्थानकात फिर्याद दाखल करुन घेण्याची प्रक्रिया सुरू होती.









