शाळेत असताना आम्हा काही मित्रांना व्यायामाची जाम गोडी लागली होती. घराजवळ ‘समर्थ व्यायाम मंदिर’ होते. तिथली फी पालकांना परवडत नव्हती. म्हणून आम्ही काशीगीर वस्ताद तालमीत जायला सुरुवात केली. कारण काशीगीर मध्ये मोफत प्रवेश होता. फक्त दर शनिवारी एक आणा ऐच्छिक वर्गणी होती. त्यातून तालमीतला एखादा प्रौढ पैलवान नारळ आणि साखरफुटाणे आणीत असे. मारुतीला नारळ फोडून सर्वांना खोबरे-साखरफुटाणे हा प्रसाद दिला जाई.
आमच्या गटात प्रदीप आणि विनू नावाची भावंडे होती. सुनील नावाचा मित्र होता. यांच्याबद्दलच थोडेसे. आम्हा चौघांपैकी प्रदीप आणि सुनील यांच्या शरीराची ठेवण जन्मजात मजबूत होती. त्यांचा स्टॅमिना जबरदस्त होता. आम्ही संध्याकाल तालमीत जायचो. गेल्यावर कपडे काढून मधोमध असलेल्या कुस्तीच्या हौद्यात उतरायचे आणि फावडय़ांनी माती उकरून सैल करायची. नंतर बाहेर येऊन व्यायामाला सुरुवात. विनू कधीच व्यायाम करीत नसे. एक नंबरचा फोपशा. गोलमटोल. तो फक्त बाजूला बसून आमचे कपडे सांभालयचा. आम्ही पाणी मागितले की धावत जाऊन पाणी आणून द्यायचा.
प्रदीप आणि सुनील एका दमात शंभर ते सव्वाशे जोर मारू शकत. मी वीस पंचवीस जोर झाले की बसून दम खायचो. मग पुन्हा प्रयत्न करायचो. तरी एका दिवसात पन्नासपेक्षा अधिक जोर कधीच मारू शकलो नाही. व्यायाम झाला की आम्ही लष्कर विभागात फिरायला निघायचो. विनूला आमच्या बरोबर यायचे असे. पण त्याला हाकलून दिले जाई. कारण लष्कर विभागात फिरायला गेल्यावर प्रदीपला आणि सुनीलला सिगारेट फुंकायची असे.
आम्ही एसएससी पास झालो. सुनीलला आणि मला चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिलले. प्रदीप आणि विनू वडिलांच्या कापडाच्या दुकानात बसू लागले. क्वचित सुनील आणि मी फिरत फिरत त्या दुकानात जायचो. दुकानात वडील नसले तर प्रदीपने सिगारेट पेटवलेली असे. आमच्यासाठी चहा आणायला विनू आपला अवजड देह सावरत धावत जायचा.
आम्हाला नोकऱया लागल्या. रिटायर झालो. मधल्या कालत प्रदीप हार्ट ऍटॅकने गेला. आमच्यातल्या सर्वात श्रीमंत सुनीलचे दिवस फिरले होते. काही वर्षांपूर्वी सुनील गेला. कधीच व्यायाम न केलेला आणि सिगारेट न ओढलेला अवाढव्य जाडय़ा विनू मात्र अजून आहे. असू देत. देव त्याला उदंड आयुष्य देवो








