मे महिन्यात युरोपीय नेत्यांना भेटणार पंतप्रधान मोदी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
चीनसोबतच्या संबंधांमधील वाढत्या कटुतेदरम्यान युरोप आणि भारत अधिकच जवळ येऊ लागले आहेत. 8 मे रोजी होणाऱया अनौपचारिक संमेलनात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भारतीय शिष्टमंडळ युरोपीय महासंघाच्या सर्व 27 राष्ट्राध्यक्षांना भेटणार आहे. ही भेट पोर्तुगालच्या पोर्तो शहरात होणार आहे. या संमेलनानंतर पंतप्रधान मोदी आणि पोर्तुगालचे पंतप्रधान अँटोनियो कोस्टा यांच्यात द्विपक्षीय बैठकही होईल. याचबरोबर भारतीय आणि युरोपीय उद्योगक्षेत्रादरम्यान एक गोलमेज परिषदही निश्चित करण्यात आली आहे.
भारत स्वतःच्या राष्ट्रीय तर युरोप स्वतःच्या खंडीय प्राथमिकतांसह एकत्र येत आहेत. युरोपच्या 5 प्राथमिकता असून भारताच्या दृष्टीनेही त्या महत्त्वाच्या आहेत. ग्रीन ट्रांजिशन, डिजिटल ट्रांजिशन, सोशल ट्रांजिशन, लवचिकता आणि ‘मुक्तपणा’ या 5 प्राथमिकता असून त्यांच्याद्वारे बहुआयामी जगाची पुन्हा पुष्टी होणार असल्याचे युरोपीय महासंघाच्या अधिकाऱयाने म्हटले आहे.
चीनपासून राखले अंतर
बहुध्रुवीय आशिया असायला हवे असे युरोपचे मानणे आहे, कारण आशियात भारताची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे या अधिकाऱयाने म्हटले आहे. फेब्रुवारीच्या प्रारंभी चीन आणि पूर्व युरोपीय देशांदरम्यान झालेल्या ‘17 प्लस 1’ संमेलनातून बुल्गारिया, रोमानिया, स्लोवेनिया आणि 3 अन्य बाल्टिक देशांनी अंग काढून घेतले होते. यामुळे युरोप आणि आशियातील चीनच्या वाढत्या हालचालींवर नजर ठेवणाऱयांचे कान टवकारले गेले आहेत.
उच्चस्तरीय चर्चा
भारत आणि युरोपीय महासंघ यांच्यात अलिकडेच एक उच्चस्तरीय चर्चा झाली आहे. युरोपीय महासंघ आणि भारत यांच्यातील परिषद पाहता व्यापाराच्या क्षेत्रातील संधी शोधत आहोत. युरोपीय महासंघाच्या नव्या व्यापार धोरणातही भारतासोबत भागीदारीला एक उद्देश ठरविण्यात आल्याची माहिती युरोपीय आयोगाचे कार्यकारी उपाध्यक्ष वाल्दिस दोम्ब्रोविस्किस यांनी दिली आहे. युरोपीय महासंघाचे अध्यक्षत्व जानेवारी महिन्यात पोर्तुगालला प्राप्त झाले आहे. भारत आणि युरोपीय महासंघ यांच्यात 2000 साली पहिली परिषद पार पडली होती, तेव्हा युरोपीय महासंघाचे अध्यक्षत्व पोर्तुगालकडेच होते.









