प्रतिनिधी / दापोली
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या विविध पदांच्या भरतीसाठी रविवारी राज्यभरात विविध केंदावर परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. या परीक्षेसाठी दापोली येथील वराडकर बेलोसे महाविदयालय या केंदावर रविवारी चांगलाच गोंधळ झाला. या महाविदयालयाच्या व्यवस्थापनाला परीक्षेचे हे केंद असल्याची माहिती परिक्षेच्या दिवशीच सकाळी देण्यात आल्याने परीक्षार्थींना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला. अनेक परिक्षार्थीनी या केंदावरील परीक्षा रद्द करा अशी मागणी केली.
यानंतर परिक्षाकेंद्रात आलेले दापोलीचे निवासी नायब तहसीलदार सुरेश खोपकर व सहाय्यक पोलिस निरीक्षक पूजा हिरेमठ, गटशिक्षणाधिकारी संतोष भोसले, भाजपाचे केदार साठे यांनी या केंद्रावरील अधिकाऱयांना परीक्षा रद्द करण्याचा अधिकार नसल्याचे सांगितल्यावर चिडलेल्या परीक्षार्थींनी आम्ही परीक्षाच देणार नाही असे सांगितले. मात्र या सर्वांची समजूत काढल्यावर विद्यार्थी परीक्षा द्यायला तयार झाले.
या सगळ्या घडल्या प्रकरणावरून प्रशासनाने कोणतेच नियोजन केलेले नसल्याचे समोर आले. याचा फटका परिक्षा देणाऱया विद्यार्थ्यांना बसल्यामुळे अनेक ठिकाणांहून नाराजी व्यक्त होत आहे.