प्रतिनिधी / नागठाणे :
विनामास्क बेजबाबदारपणे फिरणाऱ्यांविरुद्ध बोरगाव पोलिसांनी कारवाईची धडक मोहीम राबविण्यास नुकतीच सुरवात केली आहे. गेल्या चार दिवसात बोरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावांमधून कडक पेट्रोलिंग करत विनामास्कच्या ५५ केसेस करण्यात आल्या असून त्यांच्याकडून २७,५०० रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे. बोरगाव पोलिसांच्या या धडक मोहिमेची धास्ती परिसरातील नागरिकांनी घेतली आहे.
सध्या महाराष्ट्रासह सातारा जिल्ह्यात कोरोना साथरोगाच्या दुसऱ्या लाटेची चर्चा आहे. जिल्ह्यात याची दुसरी लाट येऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे पुन्हा एकदा ‘मास्क वापरा-सॅनिटायझर वापरा व वेळोवेळी हात धुवून सोशल डिस्टन्स पाळा’ या त्रिसूत्रीचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तरीही अनेक बेजबाबदार नागरिक विनामास्क बाहेर फिरताना आढळत असून त्यामुळे कोरोना पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. यावर आळा घालण्यासाठी नुकतेच जिल्हा प्रशासनाने विनामास्क बाहेर फिरणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, तरीही अनेकजण विनामास्क फिरत असल्याने अखेर पोलिसांनी गेल्या चार दिवसांपासून धडक कारवाया करण्यास सुरुवात केली.









