खडेबाजार पोलिसांची कारवाई, चार दुचाकी जप्त : आरोपीची हिंडलगा कारागृहात रवानगी
प्रतिनिधी / बेळगाव
बेळगाव शहर व उपनगरांमध्ये मोटारसायकल चोरणाऱया एका अट्टल चोरटय़ाला शुक्रवारी खडेबाजार पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या जवळून 2 लाख रुपये किमतीची चार वाहने जप्त करण्यात आली आहेत. पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांनी ही माहिती दिली आहे.
मलिकजान वजीर पापा (वय 19, रा. ज्योतीनगर, कंग्राळी खुर्द) असे त्याचे नाव आहे. खडेबाजारचे पोलीस निरीक्षक धिरज शिंदे, उपनिरीक्षक आर. बी. सौदागर, हवालदार शंकर शिंदे, बसवराज उज्जनकोप्प, विनोद कुंगारे, गोपाल अंबी, रमेश गणी, प्रकाश एल. आदींनी ही कारवाई केली आहे.
या प्रकरणी मलिकजानच्या आणखी एका साथीदारालाही ताब्यात घेतले असून तो अल्पवयीन आहे. मारुती गल्ली येथे पोलिसांनी मलिकजानला संशयावरुन ताब्यात घेवून त्याची चौकशी केली असता त्याने मोटारसायकली चोरल्याची कबुली दिली होती. त्याच्या जवळून एक पॅशन प्लस व तीन डिओ जप्त करण्यात आल्या आहेत.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मलिकजान व त्याच्या साथीदाराने चारही दुचाकी बेळगाव शहर व उपनगरांतून चोरल्या आहेत. नेहरुनगर, केळकरबाग व हंस टॉकीज रोडवरुन ही वाहने चोरल्याची कबुली त्याने दिली. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तपासणी करुन मलिकजानला न्यायालयासमोर हजर करण्यात आले. त्यानंतर त्याची रवानगी हिंडलगा कारागृहात करण्यात आली.









