डॉ. विनोद गायकवाड यांचे प्रतिपादन : सरस्वती वाचनालयातर्फे आयोजित स्वा. सावरकर व्याख्यानमालेत ‘महाकवी सावरकर’वर व्याख्यान
प्रतिनिधी / बेळगाव
मराठी साहित्यामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा समावेश केल्याशिवाय या साहित्याचा इतिहास पूर्ण होऊच शकत नाही, असे मत डॉ. विनोद गायकवाड यांनी व्यक्त केले. सरस्वती वाचनालयातर्फे आयोजित स्वा. सावरकर व्याख्यानमालेत ‘महाकवी सावरकर’ या विषयावर ते बोलत होते.
व्यासपीठावर प्रमुख पाहुणे राजे हरीहरराव पटवर्धन, वाचनालयाच्या अध्यक्षा स्वरुपा इनामदार, कार्याध्यक्ष सुहास सांगलीकर, डॉ. एस. जी. आरबाळे, डॉ. दत्तप्रसाद गिजरे, सुभाष इनामदार, कार्यवाह आर. एम. करडेगुद्दी, जगदीश कुंटे उपस्थित होते. अक्षता व विनायक मोरे यांनी सरस्वती वंदन व सावरकर गीत सादर केले. पटवर्धन राजे, विनोद गायकवाड व मान्यवरांनी दीपप्रज्वलन केले. स्वरुपा इनामदार यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. जी. बी. इनामदार यांनी डॉ. गायकवाड यांचा सत्कार केला. त्यांचा परिचय सूत्रसंचालक हिमांगी प्रभू यांनी केला. तसेच व्यंगचित्रकार जगदीश कुंटे यांची लोकमान्य ग्रंथालयाच्या कार्याध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आर. एम. करडेगुद्दी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच हिमांगी प्रभू यांचा सत्कार स्वरुपा इनामदार यांनी केला.
डॉ. गायकवाड म्हणाले, सावरकरांची कविता म्हणजे काळय़ा पाण्यातून उमललेले सूर्याचे फूल आहे. कारागृहाच्या भिंती हाच त्यांच्यासाठी कागद होता. घायपाताच्या काटय़ाने लिहित असले तरी तो काटा तपासणीवेळी सापडू नये म्हणून शरीरात टोचून लपवावा लागे. पण हे सर्व सोसूनही त्यांनी विपूल लेखन केले.
सावरकरांच्या कवितेचा स्वातंत्र्य हा ‘आरंभ’, राष्ट्रीयत्त्व हा ‘आत्मा’ तर सर्व वंचितांचा उद्धार हे ब्रीद होते. ज्याला कवी व्हायचे आहे त्यांनी सावरकरांच्या कविता वाचाव्यात. सत्त्व व स्वत्व यांचा मिलाफ त्यांच्या काव्यात दिसतो. सावरकरांचा वाद सागराशी आहे. त्यातूनच ते ‘जयोस्तुते’ हे गीत लिहू शकले. स्वातंत्र्यदेवतेला अनेक तऱहेने ते विनवतात. कविता म्हणजे स्वतःला सोलून घेणे याचा प्रत्यय सावरकरांच्या कविता वाचताना सातत्याने येतो, असेही डॉ. गायकवाड यांनी सांगितले.
सावरकर स्वतः पराक्रम आहेत व पराक्रमाची पूजाही करतात. जे जे प्रतिकूल ते ते अनुकूल आणि चांगल्यातून चांगलेच घडेल, यावर त्यांचा विश्वास होता. सावरकर हे कवी रविंद्रनाथ टागोरांपेक्षाही वरचढ कवी होते. आपला जन्म सुखासाठी नाही असे ते नेहमी मानत. त्यामुळेच ते उत्तुंग असे कार्य करू शकले, असे वक्त्यांनी नमूद केले.
…तेव्हाच माझ्या जीवनात पौर्णिमेचा चंद्र उगवेल!
एकीकडे विज्ञानवादी दृष्टिकोन व दुसरीकडे तितकीच तरल काव्यात्म वृत्ती असा विलक्षण मिलाफ त्यांच्या काव्यात दिसतो. माझ्या मातृभूमीची सुटका होईल तेव्हाच माझ्या जीवनात पौर्णिमेचा चंद्र उगवेल, अशी मातृभूमीबद्दलची निष्ठा बाळगणारे सावरकर म्हणूनच वेगळे होते, असे सांगून गायकवाड यांनी समारोप केला.
राजे पटवर्धन यांनी सावरकर म्हणजे धगधगत्या अंगारातील मार्दव असे सांगून व्याख्यानमालेला शुभेच्छा दिल्या. तसेच त्यांनी मुदगल पुराणाची प्रत वाचनालयाला दिली. या कार्यक्रमाला हमारा देश संघटनेचे सहकार्य लाभले.









