म्हासुर्ली / वार्ताहर
राधानगरी,पन्हाळा, गगनबावडा तालुक्यात विभागलेल्या धामणी खोऱ्यातील शेकडो हेक्टर जमीन ओलीताखाली येण्यासाठी महत्वपुर्ण ठरणाऱ्या राई (ता.राधानगरी) येथील रखडलेल्या मध्यम प्रकल्पाच्या कामाची निविदा तात्काळ प्रसिध्द करण्याच्या सुचना आमदार प्रकाश आबिटकर यांनी पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता श्री.सुर्वे यांना केल्या आहेत.
कोल्हापूर येथे सिंचन भवनमध्ये झालेल्या बैठकीमध्ये बोलताना आमदार आबिटकर म्हणाले, की राज्यासह देशभरामध्ये कोरोना महामारीमुळे संपुर्ण जनजीवन ठप्प झाले होते. राज्यात कोरोना महामारीमुळे राज्य शासनाने सर्व लक्ष सार्वजनिक आरोग्य विभागाकडे केंद्रीत करून ०४ मे, २०२० रोजी निर्गमित केलेल्या वित्त विभागच्या शासन निर्णयामुळे राज्यातील सर्वच विभागांच्या कामकाजास स्थगिती देण्यात आली होती.याचा फटका प्रामुख्याने २० वर्षे रखडलेल्या धामणी मध्यम प्रकल्पाच्या काम सुरू करण्यास देखील बसला आहे.परिणामी धामणी प्रकल्पाची निवीदा पुन्हा प्रसिध्द करण्यास विलंब झाला आहे. तरी सदर कामाची निवीदा एक महिन्यामध्ये पुन्हा प्रसिध्द करण्यास पाटबंधारे विभागास सांगितले
धामणी प्रकल्पाचे काम सुरु करण्याकरीता अखेर ८ मार्च २०२० रोजी २३८ कोटी रुपयांची निविदा जलसंपदा विभागाकडून निविदा प्रसिध्द करण्यात आली. परंतु या निविदा प्रक्रियेस विरोध दर्शवत पूर्वीचा जुना ठेकेदार आपले प्रलंबित बिल मागणीबाबत न्यायालयामध्ये गेला होता. यानुसार पाटबंधारे विभागाने आपले म्हणने न्यायालयासमोर मांडत ठेकेदाराचे थकीत ५५ कोटी रुपयांचे देणेआदा केले आहे. त्यामुळे सदर प्रकल्पाची फेर निविदा प्रसिध्द करण्यामधील मोठा अडसर दुर झाला आहे.
याबाबत प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता एस.आर.पाटील म्हणाले की, राज्य शासनाने अत्यावश्यक बाबींवरील निर्बंध उठविल्यामुळे प्रकल्पाची निविदा प्रसिध्द करण्यात येणार असून प्रकल्पाची सुधारीत दरसुचीनुसार अंदाजीत २७७ कोटी रुपयांची निवीदा प्रसिध्द करण्याबाबतची कार्यवाही जलसंपदा विभागाकडून सुरू असल्याचे सांगितले.
तसेच धामणी प्रकल्प ग्रस्तांच्या पुनर्वसनाकरीता नव्याने वसविण्यात आलेल्या तीन गावठाणांकरीता पायाभूत सोयीसुविधा उपलबध करण्याबाबत बैठकित चर्चा झाली. यामध्ये प्रामुख्याने राई येथील गावठाण क्र.१ व २ मधील घरे बांधून पुर्ण झाली असून आवश्यक असणारा पोहच रस्ता गट नं.९९ पडसाळी ते राई गावठाणापर्यंत करण्याचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे.
तसेच वसाहतीमध्ये पाण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली असून वितरण व्यवस्थेचे काम बाकी आहे. पुढील २ महिन्यात सदरचे काम पूर्ण करण्यात येईल. व प्राथमिक शाळा, समाजमंदीर बांधण्याचे अंदापत्रक तयार असून सदर कामे देखील सुरू होणार आहेत. सर्व गावठाणांमध्ये आवश्यक असणारे अंतर्गत रस्ते व गटर्सचे ८० काम पुर्ण झाले असून उर्वरीत काम निविदेमधील रक्कमेमधून पुर्ण करण्यात येणार आहे. वसाहतीकरीता आवश्यक असणाऱ्या विद्युत वितरण व्यवस्थेचे काम शंभर टक्के पुर्ण झालेले आहे. तर पडसाळी पैकी शेटेवाडी व तामकरवाडी येथील प्रकल्पग्रस्तांना देय असणारी ५८ हेक्टर जमीन लाभ क्षेत्रामध्ये उपलबध असून याबाबत प्रकल्पग्रस्तांना भूखंड वितरण करण्याचे काम पुनर्वसन विभागाकडून वेळेत झाल्यास प्रकल्पग्रस्तांना घरे बांधण्याची प्रक्रिया सुरू करता येईल,असे अधिकाऱ्यांनी आमदार आबिटकर यांना बैठकित सांगितले.यावेळी बैठकीस अधिक्षक अभियंता श्री.सुर्वे, कार्यकारी अभियंता एस.आर.पाटील, कार्यकारी रोहित बांदिवडेकर, स्मिता माने, अमोल नाईक उपस्थित होते.