ऑनलाईन टीम / लंडन :
पंजाब नॅशनल बँकेला (पीएनबी) हजारो कोटींचा गंडा घालून फरार झालेला हिरे व्यापारी नीरव मोदीच्या प्रत्यार्पणाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.

लंडनच्या वेस्टमिन्स्टर दंडाधिकारी न्यायालयाने आज नीरव मोदीच्या भारतात प्रत्यार्पणासाठी परवानगी दिली. भारतात एक खटला चालू आहे, ज्याचे उत्तर त्याला द्यावे लागेल, असेही न्यायदंडाधिकाऱ्यांनी सांगितले. नीरव मोदी याच्यावर पुरावे नष्ट करण्यासाठी आणि साक्षीदारांना धमकावण्याचा कट रचणे, असे गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत.
यावेळी न्यायाधिशांनी सांगितले की, मी भारत सरकारकडून देण्यात आलेले सर्व साक्षी पुरावे स्वीकारले आहेत. नीरव मोदीला दोषी ठरवण्यासाठी हे पुरावे पूरेसे आहेत. त्यामुळे या पुरव्यांबाबत मी संतुष्ट आहे.
नीरव मोदीची मानसिक स्थिती व प्रकृती प्रत्यार्पणासाठी योग्य नसल्याचा दावाही लंडन कोर्टाने फेटाळून लावला. आर्थर रोडच्या बरॅक 12 मध्ये नीरव मोदीला ठेवण्यात येणार असल्याच्या आश्वासनांनाही न्यायालयाने समाधानकारक म्हटले आहे. कोर्टाने म्हटले आहे की, मुंबईतील आर्थर रोड कारागृहातील बॅरेक 12 मध्ये ठेवावे. त्याला अन्न, शुद्ध पाणी, स्वच्छ शौचालय, पलंगाची सुविधा देण्यात यावी. मुंबई सेंट्रल जेलचे डॉक्टरही नीरवसाठी उपलब्ध असावेत.
न्यायालयाने कलम 3 अंतर्गत भारतात जीवाला धोका असल्याची याचिकाही फेटाळली. नीरव मोदीची आत्महत्या करण्याच्या प्रवृत्तीबद्दल दिलेला अहवाल आम्ही पाहिला असल्याचेही कोर्टाने यावेळी सांगितले.
दोन वर्षांपूर्वी नीरव मोदी यांना ब्रिटनच्या स्कॉटलंड यार्ड पोलिसांनी लंडनमधून 13 मार्च 2019 रोजी अटक केली होती, त्यानंतर दक्षिण पश्चिम लंडनच्या वॅन्ड्सवर्थ कारागृहातील तुरुंगात डांबण्यात आले होते. आता कोर्टाचा निर्णय ब्रिटनच्या गृहसचिव प्रीती पटेल यांना पाठविला जाईल, जो या प्रकरणात उच्च न्यायालयात अपील करण्यास परवानगी द्यायचे की नाही याबाबत निर्णय घेतील









