प्रतिनिधी / बेंगळूर
विकासकामांना अनुदान नाकारण्यास आर्थिक परिस्थितीचे कारण पुढे करणाऱया राज्य सरकारने खासदार, मंत्र्यांसाठी नव्या कार खरेदी करण्यास परवानगी दिली आहे 32 मंत्री आणि 28 खासदारांना प्रत्येकी 23 लाख रुपयांच्या नव्या कार खरेदीसाठी हिरवा कंदील दाखविण्यात आला आहे. विशेष म्हणजे यापूर्वी कार खरेदीसाठी प्रत्येकी 21 लाख रुपये निश्चित करण्यात आले होते. त्यानंतर सरकारने त्यात बदल करत 22 लाख रु. निर्धारित केले. आता जारी केलेल्या अधिसूचनेमध्ये एका कारसाठी 23 लाख रुपये निधी ठरविला आहे. अर्थखात्याने यासाठी मंजुरी दिली आहे. सरकारच्या या भूमिकेमुळे आर्थिक संकटकाळात लोकप्रतिनिधींसाठी नव्या कार खरेदी करण्याची गरज आहे का?, असा प्रश्न जनतेतून उपस्थित होत आहे. राज्यात कोरोना महामारीमुळे राज्याची आर्थिक परिस्थिती ढासळली आहे. त्यामुळे विकासकामांसाठी पुरेसे अनुदान उपलब्ध नसल्याचे कारण सरकारकडून पुढे केले जात आहे. मात्र, अनुदानाची कमतरता असल्याचे कारण पुढे करणाऱया सरकारने मंत्री, खासदारांसाठी नव्या कार खरेदीसाठी अनुदान उपलब्ध केल्याने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.









