क्रीडा प्रतिनिधी / मडगाव
एससी ईस्ट बंगालचा 2-1 गोलानी पराभव करून नॉर्थईस्ट युनायटेड एफसीने आयएसएल फुटबॉल स्पर्धेच्या पहिल्या चार संघात प्रवेश मिळविला. काल फातोर्डा येथील नेहरु स्टेडियमवर खेळविण्यात आलेल्या सामन्यात नॉर्थईस्ट युनायटेडसाठी सुहैर वाडाक्केपिडिकाने एक गोल केला तर ईस्ट बंगालच्या सार्थक गोलूई याच्याकडून एका सॅल्फ गोलची नोंद झाली. पराभूत ईस्ट बंगालचा एकमेव गोल सार्थक गोलूईने केला.
या विजयाने नॉर्थईस्ट युनायटेडला तीन गुण प्राप्त झाले. या सामन्यापूर्वी पाचव्या स्थानावर असलेला नॉर्थईस्ट युनायटेड आता चौथ्या स्थानावर आला असून चौथ्या स्थानावर असलेला हैदराबाद एफसी आता पाचव्या स्थानावर घसरला आहे. नॉर्थईस्ट युनायटेडचे आता 19 सामन्यांतून सात विजय, नऊ बरोबरी आणि तीन पराभवाने 30 गुण झाले असून ते आता चौथ्या स्थानावर आहेत. एफसी गोवा आणि नॉर्थईस्टचे 19 सामन्यांतून प्रत्येकी 30 गुण झाले असले तरी चांगल्या गोल सरासरीमुळे एफसी गोवा तिसऱया स्थानावर आहेत. 19 सामन्यांतील 28 गुणांनी हैदराबाद एफसी पाचव्या स्थानावर आहे. ईस्ट बंगालचा स्पर्धेतील कालचा आठवा पराभव. 19 सामन्यांतील तीन विजय आणि आठ बरोबरीने त्यांचे 17 गुण आणि नववे स्थान कायम राहिले.
आता 26 फेब्रुवारी रोजी नॉर्थईस्ट युनायटेडची लढत केरळ ब्लास्टर्सशी तर 28 रोजी एफसी गोवाचा सामना हैदराबाद एफसी संघाविरूद्ध होणार असून या सामन्यांनंतर प्ले-ऑफमध्ये जाणारे मुंबई आणि एटीके मोहन बागान संघानंतरचे दोन संघ ठरणार आहेत.
सामन्यातील सर्व तिन्ही गोल दुसऱया सत्रात झाले. सामन्याच्या तिसऱया मिनिटाला नॉर्थईस्टची गोल करण्याची संधी ईस्ट बंगालचा गोलरक्षक मिर्शाद मिचोने उत्कृष्ट गोलरक्षण करून उधळून लावली. यावेळी त्याने लुईस माशादोच्या पासवर डिशोर्न ब्राऊनचा फटका अडविला. त्यानंतर परत एकदा मिचोने इम्रान खानच्या पासवर लुईस माशादोला गोल करण्याची संधी दिली नाही.
दुसऱया सत्रात तिसऱयाच मिनिटाला नॉर्थईस्ट युनायटेडचा स्ट्रायकर सुहैर वाडाक्केपिडिकाने गोल करून आघाडी घेतली. या गोलानंतर नॉर्थईस्ट युनायटेडची सॅल्फ गोलामुळे आघाडी दोन गोलांनी वाढली. प्रतिस्पर्धी खेळाडूने मारलेला फटका परतविण्याच्या यत्नात सार्थक गोलूईनेच चेंडू आपल्याच गोलमध्ये टाकला. सामना संपण्यास सहा मिनिटे शिल्लक असताना ईस्ट बंगालने आपली पिछाडी एका गोलने कमी केली. यावेळी सुरचंद्र सिंगने घेतलेल्या फ्रिकीकवर सार्थक गोलूईचा हेडर थेट नॉर्थईस्टच्या गोलमध्ये केला. हा गोल नॉर्थईस्टचा गोलरक्षक सुभाषिश रॉयच्या चुकीमुळे झाला.









