तरुण भारत संवाद पंढरपूर / संकेत कुलकर्णी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर माघ शुद्ध द्वादशी अर्थात २४ फेब्रुवारी रोजी पंढरपुरात गर्दी होऊ शकते. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेवरून मंदिर समितीने बुधवारी विठ्ठलाचे मुखदर्शन हे बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर आणि कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली.
माघ एकादशीच्या निमित्ताने मंगळवारी २३ फेब्रुवारी रोजी पंढरपुरात संचारबंदीचा अंमल लागू आहे. अशातच माघ द्वादशीला २४ फेब्रुवारी रोजी रोजी भाविकांची गर्दी राहू शकते. असा पोलीस प्रशासनाचा आणि जिल्हा प्रशासनाचा तर्क असल्याने मंदिर समितीकडून २४ फेब्रुवारी रोजी विठ्ठलाचे मुखदर्शन बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. माघीच्या निमित्ताने २२ आणि २३ फेब्रुवारी रोजी मंदिर समितीकडून विठ्ठलाचे मुखदर्शन हे सर्व भाविकांना बंद ठेवण्याचा निर्णय यापूर्वीच झाला होता. आता यामध्ये २४ फेब्रुवारी रोजी ही मंदिर हे भाविकांना दर्शनासाठी बंद होत असल्याने पंढरपूरातील पोलिसांचा बंदोबस्त देखील गुरुवारी पहाटे पर्यंत राहू शकतो. अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.









