बसस्थानक परिसरात जलवाहिनी जैसे थे ठेवून गटारींचे बांधकाम केल्याने समस्या : स्मार्ट सिटीचे काम अशास्त्रीय पद्धतीने होत असल्याची तक्रार
प्रतिनिधी / बेळगाव
शहरात स्मार्ट सिटी योजनेंतर्गत गटारीचे बांधकाम करण्यात येत आहे. मात्र, हे काम अशास्त्रीय पद्धतीने होत असल्याची तक्रार नागरिक करीत आहेत. मध्यवर्ती बसस्थानक परिसरात रस्त्याशेजारी करण्यात आलेल्या गटारीमध्ये जलवाहिनी आहे. मात्र जलवाहिनी तशीच ठेवून गटार करण्यात येत असल्याने कचरा अडकून सांडपाणी तुंबण्याची शक्मयता आहे.
स्मार्ट सिटीची कामे केवळ निधीच्या विनियोगासाठी होत असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. कोणतीच कामे व्यवस्थित नसल्याने निकृष्ट दर्जाच्या कामाचा नमुना चव्हाटय़ावर आला आहे. शहरातील विविध भागात तसेच प्रमुख रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. मात्र, काँक्रिटीकरण करत असताना काही ठिकाणी चरी सोडण्यात आल्या होत्या. त्या ठिकाणी पेव्हर्स बसविण्यात आले आहेत. काँक्रीटच्या रस्त्यापेक्षा उंच पेव्हर्स असल्याने दुचाकी वाहनधारकांना दणका बसत आहे. त्याचप्रमाणे खानापूर रोडवर बीएसएनएल कार्यालयाशेजारील रस्ता व्यवस्थित नसल्याने या ठिकाणीही रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचे निदर्शनास आले आहे. काही रस्त्यांवर भेगा पडल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे खरोखरच स्मार्ट सिटी बनविण्यात येत आहे का? असा मुद्दा उपस्थित होत आहे.
मात्र, स्मार्ट सिटीची कामे करताना कोणतीच खबरदारी घेतली जात नाही. मध्यवर्ती बसस्थानकाजवळ खडेबाजार रोडच्या कॉर्नरवर गटारीचे बांधकाम करण्यात येत आहे. पण येथील गटारीमधून आडवी जाणारी जलवाहिनी तशीच ठेवण्यात आली आहे. त्यामुळे सांडपाणी अडकण्याचा धोका आहे. याबाबत स्मार्ट सिटीच्या अभियंत्यांनी कोणतीच खबरदारी घेतली नाही. भविष्यात या ठिकाणी कचरा साचण्याचा धोका आहे.
दक्षता घेऊन गटारींचे बांधकाम करणे गरजेचे
गटारींचे बांधकाम करण्याची मोहीम स्मार्ट सिटीअंतर्गत राबविण्यात आली आहे. मात्र जलवाहिन्या, विद्युत वाहिन्या, गॅस वाहिन्यांचा अडथळा सांडपाणी वाहण्यास होणार नाही, याची दक्षता घेऊन गटारींचे बांधकाम करण्याची गरज आहे. मात्र, सदर वाहिन्या स्थलांतर न करताच बांधकाम करण्यात येत आहे. जलवाहिन्या व विद्युत वाहिन्या गटारीच्या तळाशी घालणे, किंवा वरील भागावर घातल्यास सांडपाणी वाहण्यास अडथळा निर्माण होणार नाही. पण काही ठिकाणी जलवाहिन्या व विद्युत वाहिन्या गटारीच्या मध्यभागी आडव्या आल्याने कचरा अडकून सांडपाणी वाहण्यास अडथळा निर्माण होण्याची शक्मयता आहे. काही ठिकाणी विविध वाहिन्यांमुळे कचरा अडकतो. त्यामुळे महापालिकेच्या स्वच्छता कामगारांची डोकेदुखी वाढते. मुळात महापालिकेकडून नियमितपणे गटारी स्वच्छ केल्या जात नाहीत. त्यामुळे सांडपाणी तुंबून गटारी ओव्हरफ्लो होतात. ही समस्या निर्माण होऊ नये याकरिता खबरदारी घेणे आवश्यक आहे.









