ऑनलाईन टीम / चेन्नई :
चेन्नईतील एक नामांकित शाळा 10 वीच्या प्रश्नपत्रिकेवरून वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या शाळेने दहावीच्या इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत प्रजासत्ताक दिनी दिल्लीतील ट्रॅक्टर परेडमध्ये सहभागी झालेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे वर्णन ‘हिंसक उन्माद’ असे केले आहे.

शाळेने 11 फेब्रुवारीला झालेल्या दुसऱ्या उजळणी परीक्षेत विद्यार्थ्यांना एका दैनिक वृत्तपत्राच्या संपादकाला पत्र लिहिण्यास सांगितले होते. त्याचा विषय होता, ‘प्रजासत्ताक दिनी राष्ट्रीय राजधानीत झालेल्या हिंसाचाराने नागरिकांच्या हृदयात शेतकऱ्यांविषयी द्वेष आहे. कृषी कायद्यांना विरोध करणाऱ्या आंदोलकांनी सार्वजनिक मालमत्ता उद्ध्वस्त केली आणि पोलिसांवर हल्ला केला. त्यामुळे शेतकऱ्यांचे समर्थन कोणत्याही प्रकारे होऊ शकत नाही’.
संगीतकार टी एम कृष्णा यांनी ही वादग्रस्त प्रश्नपत्रिका ट्विट केली आहे. त्यामुळे त्यांना अनेक रिप्लाय येऊ लागले असून ही शाळा आता वादग्रस्त ठरत आहे.









