प्रतिनिधी / सातारा
सातार्यातील पाटण तालुक्यातील 155 कामांना निधी कमी पडू देणार नसून ही कामे दर्जेदार करुन पाटणकरांचे स्वप्न सत्यात उतरवावे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केले. पाटण मतदार संघातील ग्रामीण डोंगरी भागात सन 2020-21 या आर्थिक वर्षात मंजूर विविध विकासकामांचे ऑनलाईन ई-भूमिपूजन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी लोकनेते बाळासाहेब देसाई सभागृह, शिवदौलत सह. बँक, मल्हार पेठ येथून गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभराज देसाई यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
155 कामांमध्ये रस्ते, मागासवर्गीय मुलांसाठी अभ्यासिका यासह विविध विकास कामे हाती घेतली आहेत. ही कामे दर्जेदार करावीत. आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे, महाराजांनी मराठी माणसाला जिद्द व प्रेरणा दिली आहे. त्या जिद्दीच्या आणि प्रेरणेच्या जोरावर महाराष्ट्राने अनेक संकटांवर मात केली आहे. आताही करोनाचे सकंट महाराष्ट्रावर आहे, या संकटासाठी आपला लढा यापुढेही सुरु राहील, या लढ्यामध्ये नागरिकांनी स्वत:ला मास्कचा वापर, सुरक्षित अंतर व वेळोवेळी हाताची स्वच्छता याची शिस्त लावली पाहिजे. कोरोनाचे संकट असतानाही पाटण मतदार संघातील नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करत आहोत. आज रात्रं-दिवस आपण मेहनत घेत आहोत. या मेहनतीला यश मिळेल, अशी प्रार्थना करुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेवटी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.