मोठा गट बंडाच्या मूडमध्ये : सूर्यवंशी, मगदूम यांना संधी : नाराजीमुळे सत्ता उलथण्याची भिती
प्रतिनिधी / सांगली
महापालिकेत सत्ताधारी भाजपमध्ये नाराजीनाट्य उफाळून आले आहे. उपमहापौर आनंदा देवमाने यांच्यासह तब्बल नऊ नगरसेवक गायब झाले आहेत. तर महापौर महापालिकेत असूनही भाजप उमेदवारांचे अर्ज भरण्यास उपस्थित राहिल्या नाहीत. दुसरीकडे भाजपमधील मोठा गट बंडाच्या तयारीत असल्याने भाजपच्या सत्तेला सुरुंग लागण्याची चिन्हे आहेत. भाजपकडून महापौर पदासाठी धीरज सूर्यवंशी तर उपमहापौर पदासाठी गजानन मगदूम यांनी अर्ज दाखल केले. तर भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे-म्हैसाळकर यांनी मात्र या परिस्थितीचा इन्कार केला आहे. भाजपमध्ये कोणीही नाराज नाही. दोन्ही उमेदवार विजयी होतील, असा विश्वास व्यक्त केला आहे.

महापालिकेत भाजपकडे स्पष्ट बहुमत आहे. दोन सहयोगी सदस्यासह ४३ नगरसेवकांचे बळ आहे. परंतु गत अडीच वर्षात भाजपला अंतर्गत राजकारणाने चांगलेच पोखरले आहे. नगरसेवकांमध्ये असलेली प्रचंड नाराजी वेळोवेळी उफाळून आली आहे. आताही महापौर पदावरुन भाजपमध्ये घमासान सुरु होते. धीरज सूर्यवंशी, निरंजन आवटी आणि युवराज बावडेकर यांनी महापौर पदावर दावा सांगितला होता. पण भाजपने सूर्यवंशी यांचे नाव अंतिम केल्याने नाराजीमध्ये भर पडली आहे.
नेत्यांच्या बैठकीला उपमहापौर आनंदा देवमाने यांच्यासह तब्बल नऊ नगरसेवकांनी दांडी मारली आणि संपर्काच्या बाहेर गेल्याने भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यांचा मोठा गट बंडाच्या तयारीत आहे. त्यामुळे भाजपच्या सत्तेला सुरुंग लागतो की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. तर ठरवलेल्या उमेदवारांचे अर्ज भरताना विद्यमान महापौर गीता सुतार या कार्यालयात असूनही उपस्थित राहिल्या नाहीत. पक्षाकडून तसा निरोपच नव्हता असे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. त्यामुळे भाजपमधील बेनबाव चव्हाट्यावर आला आहे.
दरम्यान अर्ज दाखल करताना आमदार सुधीर गाडगीळ, शहर जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे-म्हैसाळकर, प्रदेश सदस्य शेखर इनामदार, माजी आमदार दिनकर पाटील, ज्येष्ठ नेते सुरेश आवटी, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष शिवाजी उर्फ पप्पू डोंगरे, गटनेते विनायक सिंहासने यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते. माजी आमदार नितीन शिंदे यांना संपर्क करुनही ते उपस्थित राहिले नाहीत. अनेक नगरसेवकही अनुपस्थित हेते. काहींनी अर्ज दाखल करताच काढता पाय घेतला.
नाराजी नाही, उमेदवार विजयी होतीलच
पक्षाच्या नगरसेवकांमध्ये नाराजी नाही. काही नगरसेवक लग्न तसेच रुग्णालयात असल्याने उपस्थित नव्हते. पण पक्षाच्या भूमिकेशी ते ठाम आहेत. सहयोगी सदस्यांसह ४३ नगरसेवकांचे संख्याबळ आहे. एकही नगरसेवक घोडेबाजाराला बळी पडणार नाही. त्यामुळे भाजपचे दोन्ही उमेदवार बहुमताने विजयी होतील. सर्वांना व्हीप बजाविण्यात आला आहे.
– दीपक शिंदे-म्हैसाळकर, शहरजिल्हाध्यक्ष, भाजप.
अडीच वर्षात तीन महापौर
शहरपुढील अडीच वर्षात तीन महापौर, उपमहापौर करण्यात येणार आहेत. प्रत्येकाला दहा महिने संधी देण्यात येणार आहे. दोन वेळा गटनेताही बदलण्यात येणार आहे. यावेळी महापौर म्हणून सूर्यवंशी यांना संधी देण्यात आली आहे. पक्षाच्या सर्वच नगरसेवकांना विविध पदावर काम करण्याची संधी मिळेल.
– दीपक शिंदे म्हैसाळकर








