मेघगर्जनेसह गारांच्या पावसाने शेतीचे नुकसान, सातारा शहरात किरकोळ सरी, खटाव तालुक्यात मेघगर्जनेसह गारांचा पाऊस, जिल्हय़ात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस
प्रतिनिधी / सातारा
हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार बुधवारी रात्री झालेल्या पावसानंतर गुरुवारी दुपारी पावसाने जिह्यात हजेरी लावली. वातावरणात कमालीची उष्णता आणि थंडीही असून पावसाने चांगलेच झोपडून काढले. मेघगर्जना करता विजांच्या लखलखाटासह गारांचा काही भागात पाऊस झाला. सातारा शहरात तुरळक पावसाच्या सरी सायंकाळी उशिरा झाल्या. आलेल्या पावसामुळे आलेल्या रब्बी पिकांचा हंगाम वाया जाण्याची भीती व्यक्त होत आहे.
हवामान खात्याने दर्शवलेल्या इशाऱयानुसार सातारा शहरासह जिह्यात अवकाळी पावसाने गुरुवारी दुपारीही हजेरी लावली. फलटणसह खटाव, माण तालुक्यातील काही गावांत गारांचा पाऊस झाला. वाई तालुक्यात दुपारी चांगलाच पाऊस झाला. कोरेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील काही गावांमध्ये पावसाने चांगलीच पळापळ झाली. सातारा शहरात रात्री झालेल्या पावसानंतर दुपारी वातावरणात बदल झाला. शहराच्या काही भागात पावसाचे सायंकाळी उशिरा आगमन झाले. बाजारपेठेत व्यापाऱयांनी आपल्या दुकानांची आवराआवर केली. सातारा तालुक्यातही पावसाने चांगलीच त्रेधा उडवून दिली. खरीब हंगामातील पिके पावसाने वाया गेली होती. त्यावेळी पंचनामे करण्यात आले होते. त्याची नुकसान भरपाई अजूनही मिळालेली नाही. त्यातच आता रब्बी हंगामात हुरडय़ाला ज्वारीचे पीक आलेले आहे. ते पीक वाया जाण्याची भीती शेतकऱयांमधून व्यक्त होत आहे. आज झालेल्या पावसामुळे फलटण तालुक्यात चांगलाच गारांचा सडा ठिकठिकाणी पडला होता. अवेळी मुसळधार वाई शहराकडे आलेल्या नागरिकांची, व्यापाऱयांची तसेच दुकानदारांची तर ग्रामीण भागातील शेतकरी वर्गाची तारांबळ उडाली होती.
मोळ परिसरात गारांचा वर्षाव
गुरुवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास खटाव तालुक्याच्या उत्तर भागात मोळ गावात गारांचा मोठा पाऊस सुमारे दोन तास कोसळला. विजेच्या कडकडाटात व मेघगर्जनेसह झालेल्या अवकाळी पावसात मोठय़ा प्रमाणात गारपीट झाल्याने शेतकरी वर्ग हैराण झाला आहे.









