पाटगांव / वार्ताहर
भुदरगड तालुक्याच्या पाश्चिम भागातील वासनोलीपैकी जोगेवाडी धनगरवाड्यावर गारपीठासह मुसळधार अवकाळी पावसाचा तडाखा दिल्याने शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. सर्वत्र गारांचा खच पडल्याने बर्फाचे डोंगर असल्याचा भास धनगरवाड्यावर दिसत होता. शेतात मध्ये सर्वत्र गारांचा सडा निर्माण झाला होता.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार दोन दिवस अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला होता त्याच्या अनुषंगाने आज भुदरगड तालुक्याच्या पश्चिम भागात वासनोली, कडगाव, करडवाडी तिरवडे कुडतरवाडी कोंडोशी परिसरात आज दुपारी दोन वाजल्यापासून ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस पडला.
तर वासनोली येथील जोगेवाडी धनगर वाड्यावर दुपारी तीन वाजल्यापासून ते चार वाजेपर्यंत सुमारे एक तास मोठ्या प्रमाणात गारपीट झाले असून शेतामध्ये आणि धनगर वाड्यात गारांचा खच पडलेला दिसून आला तुफान गारपीट झाल्याने शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून फणस आंबा काजू ला मोठ्या प्रमाणात दणका बसला आहे. रानात बकरी चरण्यास नेलेल्या धनगरांची बकरी गारठून गेल्याचे धनगरविठ्ठल येडगे यांनी सांगितले तर प्रथमच मोठया प्रमाणात गारपीठ झाल्याचे ग्रामस्थाकडून सांगण्यात आले.