जिल्हा विशेष शाखेची कामगिरी
प्रतिनिधी/ सातारा
सातारा पोलीस दलातील सर्व विभाग पोलीस अधिक्षक अजयकुमार बंसल यांच्या नेतृत्वाखाली चांगलेच चार्ज झालेले असून जिल्हा विशेष शाखेच्या पथकाने वाई शहरात हायड्रोपोनिक ग्रो सिस्टीमचा वापर करून कुंडय़ामध्ये गांजाची लागवड करणाऱया दोन जर्मन परदेशी नागरिकांना अटक केली आहे. या छाप्यात गांजासह इतर 8 लाख 21 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असल्याची माहिती पोलीस अधिक्षक अजयकुमार बंसल यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी जिल्हा विशेष शाखेच्या तपास पथकाचे त्यांनी अभिनंदन केले.
सर्गीस व्हिक्टर मानका (वय 31), सेबेस्टीन स्टेन मुलर (वय 25 दोन्ही रा. जर्मनी, सध्या रा. नंदनवन कॉलनी, वाई) अशी अटक केल्यांची नावे आहेत. यावेळी फलटणचे उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे, जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक विजय कुंभार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्यासह छाप्यात सहभागी झालेली टीम उपस्थित होती.
अजयकुमार बंसल यांनी सांगितले की, जिल्हा विशेष शाखेला वाई शहरातील श्री विष्णूस्मृती बंगल्यात दोन परकीय नागरिक रहात असून त्यांच्या हालचाली संशयास्पद असल्याची माहिती मिळाली. पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांनी वरिष्ठांचे मार्गदर्शन घेवून जिल्हा विशेष शाखेतील सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रताप भोसले, हवालदार प्रताप भोसले, पोलीस नाईक विश्वास देशमुख, सागर भोसले, सुमित मोरे, संभाजी साळुंखे यांच्या पथकाने सदर ठिकाणी वाई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे, उपनिरीक्षक कदम, अधिकारी व अंमलदार यांच्यासह छापा टाकला.
छापा टाकला असता त्या ठिकाणी दोन जर्मन परकीय नागरिक बंगल्यात मिळून आले. या बंगल्यात पॉली हाऊस उभारण्यात आले होते व तिथे गांजाची लहान, मोठी रोपे आढळून आली. बंगल्यातच गांजाची शेती पिकवली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. त्या ठिकाणी रोपे तयार करण्यापासून ती वेगवेगळय़ा कुंडीत वाढवून तिथे गांजा पिकवण्यात येत होता. नेमकी खातरजमा करण्यासाठी पुणे येथील न्याय सहाय्यक वैद्यानिक प्रयोगशाळेचे पथक बोलावून मंगळवारी सकाळी सविस्तर घरझडती घेण्यात आली. त्यांच्या अहवालानंतर तिथे असलेला 2 लाख 36 हजार 760 रुपये किंमतीचा 29 किलो वजनाचा गांजा तसेच कोकोपीट, खत, भुसा, फ्लॉवर ग्रोथ बुस्टर, केमिकल फवारणीचे पंक, तीन एप्झॉट फॅन्स, पाच तापमापक दर्शक मिटर, पॅनल, इन्व्हर्टर, बॅटरी, तीन पॉली हाऊस, तीन मोटार सायकल, लॅपटॉप, मोबाईल असा एकूण 8 लाख 21 हजार रुपयांचा मुद्देमाल तपास पथकाने हस्तगत केला असल्याचे बंसल यांनी सांगितले.
लाईट बिलामुळे संशय बळावला
हे दोन जर्मन नागरिक तिथे भाडय़ाने रहात होते. जिल्हा विषेश शाखेला त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्यानंतर त्यांनी तपास सुरु केल्यावर या बंगल्याचे लाईट बिल 3 लाख रुपयांच्या आसपास होते. त्यामुळे मग येथे नेमके चालते काय असा संशय बळावत गेला. त्यानंतर आलेली समोर आलेली माहिती धक्कादायक निघाली. बंगल्याच्या आतच पॉली हाऊस उभारुन तिथे गांजा पिकवला जात असल्याचा प्रकार समोर आला. या दोन्ही आरोपींवर गोवा राज्यात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल असून या गुन्हय़ात ते जामीनावर होते व वाईत येवून त्यांनी हा प्रकार सुरु केला होता.
तपासात आणखीन काही समोर येईल
हे परदेशी नागरिक येथे बेकायदा रहात होते का ? त्यांना हे रो-हाऊस भाडय़ाने देणाऱया घरमालकाचा यात काय संबंध होता का ? तसेच हा गांजा नेमका कोटे विक्री केला जात होता, आदीबाबत तपास सुरु करण्यात आला असून त्यात काही बाबी समोर येतील. जिल्हा विशेष शाखेच्या पथकाने ही अभिनंदनीय कामगिरी बजावली असून अपर पोलीस अधिक्षक धीरज पाटील व उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु असल्याचे अजयकुमार बंसल यांनी सांगितले.
छाप्यामुळे वाई तालुक्यात खळबळ
चक्क रो हाऊसच्या टेरेसवर गांजाची शेती केल्याची बाब पोलिसांनी उघडकीस आणल्यानंतर वाई शहरासह तालुक्यात चांगलीच खळबळ उडाली आहे. बंगल्यात गांजाची शेतीचा प्रकार ऐकून वाईकर देखील आवाक झाले. या प्रकाराची शहरात दिवसभर चर्चा सुरु होती. टेरेसवर गांजा शेती करताना परदेशी नागरिकांनी काळजी घेतल्याचे दिसून येत असून ही शेती करताना वाईतील काहीजणांनी त्यांना सहकार्य केल्याची चर्चा रंगू लागलेले आहे. गांजाची शेती उत्तम जोमात येईपर्यंत कसे कोणालाच कळले नाही याबाबतही उलट-सुलट चर्चा असून वाई शहरात अनाधिकृत राहणाऱयांची कधी चौकशी होणार ? असाही सवाल उपस्थित होत आहे.