संतापलेल्या शेतकऱयांचे हेस्कॉम कार्यालयासमोर आंदोलन : जिल्हय़ातून शेतकरी उपस्थित
प्रतिनिधी / बेळगाव
अक्रम सक्रम योजनेतून ठराविक रक्कम भरूनदेखील शेतकऱयांना शेतीसाठी वीजजोडणी देण्यात आलेली नाही. यामुळे संतापलेल्या शेतकऱयांनी सोमवारी नेहरूनगर येथील हेस्कॉम कार्यालयासमोर आंदोलन केले. लवकर मागण्या मान्य न झाल्यास मोठे आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱयांनी निवेदनाद्वारे दिला.
बेळगाव जिल्हय़ातील 5 तालुक्यांमध्ये विजेचे ट्रान्स्फॉर्मर बसविणे तसेच बदलण्यासाठी वेळकाढूपणा सुरू आहे. वारंवार शेतकऱयांनी हेस्कॉम अधिकाऱयांच्या भेटी घेऊनदेखील त्यांना योग्य उत्तरे देण्यात येत नाहीत. शेतकऱयांनी अक्रम सक्रम योजनेतून 23 हजार रुपये भरले होते. परंतु त्यांना अद्याप विजेची जोडणी देण्यात आलेली नसल्याचे या शेतकऱयांनी सांगितले.
नेहरूनगर येथील हेस्कॉमच्या कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. चालढकल करणाऱया अधिकाऱयांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. ट्रान्स्फॉर्मरची वेळोवेळी दुरुस्ती न केल्याने शेतांमध्ये आगी लागण्याच्या घटना वाढल्या असल्याचे यावेळी सांगण्यात आले. हेस्कॉमचे अधीक्षक अभियंता गिरीधर कुलकर्णी यांनी आंदोलन करणाऱया शेतकऱयांनी भेट घेऊन त्यांचे म्हणणे जाणून घेतले.
यावेळी नेगीलयोगी शेतकरी संघटनेनेचे जिल्हाध्यक्ष रवी पाटील, कलमेश अलवण्णावर यांच्यासह सौंदत्ती, बैलहोंगल, यरगट्टी, कित्तूर, खानापूर येथील शेतकरी मोठय़ा संख्येने निवेदन देण्यासाठी उपस्थित होते.









