मुख्यमंत्री येडियुराप्पा यांचे प्रतिपादन : शिमोगा येथे व्हर्च्युअल पद्धतीने विमानतळ कोनशिला कार्यक्रम
प्रतिनिधी / बेंगळूर
विजापूर येथे निर्माण होणाऱया विमानतळामुळे जिल्हय़ातील पर्यटन, स्थानिक यवक-युवतींना रोजगार, बागायती आणि कृषी उत्पादनांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध होईल. तसेच जिल्हय़ाचा सर्वांगिण विकास साध्य होणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी केले.
सोमवारी ते शिमोगा येथे व्हर्च्युअल पद्धतीने आयोजिलेल्या कार्यक्रमात 220 कोटी रुपये खर्चातून निर्माण होणाऱया विजापूर विमानतळाच्या कोनशिला कार्यक्रमात बोलत होते. विजापूर जिल्हय़ातील भरणापूर आणि मदभावी या गावांमधील 727 एकर जागेवर सार्वजनिक-खासगी सहभागातून विमानतळाची निर्मिती केली जात आहे. यामुळे जिल्हय़ातील द्राक्षे, डाळिंब आणि लिंबू ही बागायती पिके विविध देशांमध्ये पाठविण्यास सहकार्य होईल. शिवाय या फळांची उत्पादने घेण्यास शेतकऱयांना प्रोत्साहन मिळेल. तसेच कृषी उत्पादनांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध करणे शक्य होईल, असे ते म्हणाले.
विजापूर विमानतळ योजना भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडून ‘उडाण’ योजनेमध्ये समाविष्ट करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. ए. टी. आर.-72 विमानांच्या उड्डाणासाठी अनुकूल विमानतळ निर्माण करण्यात येत आहे. पुढे ते एअरबस-320 या विमानांच्या उड्डाणासाठी विकसित करण्यात येईल. विमानतळाचा वापर सुरु झाल्यास नागरिकांनाही याचा उपयोग होणार आहे, असे ते म्हणाले.
अलिकडेच कल्याण कर्नाटक भागात गुलबर्गा आणि बिदर विमानतळांचा वापर सुरू झाला आहे. शिमोगा विमानतळाचे कामही प्रगतीपथावर आहे. त्याचप्रमाणे विजापूर विमानतळाची कामेही नियोजित वेळेत पूर्ण करण्याची सूचना देण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले.
कोनशिला कार्यक्रमप्रसंगी शिमोगा येथे खासदार बी. वाय. राघवेंद्र, विधानपरिषद सदस्य रुद्रेगौडा, आमदार अगर ज्ञानेंद्र, पायाभूत सुविधा खात्याचे मुख्य सचिव कपील मोहन, मुख्यमंत्र्यांचे सचिव एस. सेल्वकुमार, जिल्हाधिकारी के. बी. शिवकुमार उपस्थित होते.
पहिल्या टप्प्यात 95 कोटी रु. खर्च होणार
विजापूर विमानळासाठी एकूण 220 कोटी रुपये खर्च येणार असून पहिल्या टप्प्यात 95 कोटी रुपये खर्च होतील. 18 महिन्यांत पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण करण्याची मुदत देण्यात आली आहे. या टप्प्यात रन-वे, विमानतळ टर्मिनल, टॅक्सी-वे आणि एप्रोन निर्माण करण्यात येतील. हे काम पूर्ण झाल्यानंतर विमानतळ वापरासाठी खुले करता येईल. त्यानंतर 125 कोटी रुपये खर्चातून दुसऱया टप्प्यातील कामे हाती घेण्यात येतील, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.









