केएसआरपी पोलिसांना शारीरिक तंदुरुस्तीसाठी कसरतीला प्रोत्साहन
प्रतिनिधी / बेंगळूर
राज्य राखीव पोलीस दलाच्या कर्मचाऱयांनी (केएसआरपी) पोटाचा घेर कमी करावा, वजन कमी करावे, अशा सूचना केएसआरपीची अतिरिक्त पोलीस महासंचालक अलोककुमार यांनी दिल्या आहेत.
राज्य राखीव पोलीस दलाला स्वतःचे असे एक मानाचे स्थान आहे. राज्यात होणाऱया दंगली व इतर तातडीच्या प्रसंगी या दलातील पोलिसांची भूमिका महत्त्वाची आहे. मात्र, अनेक वेळा शारीरिक कसरती नसल्याने या पोलिसांचे वजन वाढले आहे. त्यामुळे तातडीच्या प्रसंगी जलद गतीने कामे करण्यात केएसआरपीच्या पोलिसांना शक्य होत नाही. त्यामुळे काही प्रसंगी टीकाही होते. त्यामुळे अतिरिक्त पोलीस महासंचालक अलोककुमार यांनी पोलिसांना पोटाचा घेर कमी करण्यासाठी वयोगटानुसार प्रमाण ठरवून दिले आहे.
वयोगटानुसार प्रमाण निश्चित
40 वर्षाखालील केएसआरपी पोलिसांनी 10 किलो, 40 ते 50 वयोगटातील पोलिसांनी 5 किलो, 50 ते 55 वयोगटातील पोलिसांनी अडीच किलो वजन कमी करावे, असे अतिरिक्त पोलीस महासंचालक अलोककुमार यांनी आदेशपत्रकात म्हटले आहे. 30 एप्रिल 2021 पूर्वी याची अंमलबजावणी करावी, अशी सूचनाही त्यांनी दिली पत्रकात दिली आहे.









