प्रतिनिधी / कोल्हापूर
संत सेवालाल महाराज 282 वर्षांपुर्वी पुरोगामी विचाराचे होते. लमान समाजातील लोकांनी पारंपारिक रूढी-परंपरांमधून बाहेर पडून शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आले पाहिजे, असे प्रतिपादन दलितमित्र व्यंकाप्पा भोसले यांनी केले.
लमान समाज विकास संघाच्या वतीने शाहू स्मारक भवनमध्ये संत सेवालाल महाराज यांच्या 282 व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी लमान महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामचंद्र पवार होते. दसरा चौकातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून कार्यक्रमाला सुरूवात करण्यात आली.
भोसले म्हणाले, मुलांच्या शिक्षणासाठी लमान समाजाने एका ठिकाणी वस्ती करून राहिले पाहिजे. लमान समाज ब्रिटीश काळात मिठाचा व्यापार करीत होता. स्वातंत्र्यानंतर खुदाई आणि बांधकाम व्यवसाय करीत आहे. त्यामुळे एका ठिकाणी कायमस्वरूपी पत्ताच राहात नाही. जनगननेत नोंद नसल्याने संविधानाच्या चौकटीत समाजाला बसवता आले नाही. त्यामुळे त्यांची नोंद भटक्या विमुक्तांमध्ये आहे. शासनातर्फे आश्रम शाळेच्या माध्यमातून समाजातील मुलांना शिक्षण दिले जाते. या शिक्षणाचा फायदा घेवून समाजातील जास्तीत जास्त मुलांनी शिक्षण घ्यावे. मराठा महासंघाचे अध्यक्ष वसंतराव मुळीक म्हणाले, लमान समाजाने कोल्हापुरात एकत्र येवून वस्ती केली पाहिजे. मल्हार सेना अध्यक्ष बबनराव राणगे, भटके विमुक्त विकास परिषदेचे संयोजक अशोक लाखे यांनी मनोगत व्यक्त केले.
संतोष राठोड यांनी प्रास्ताविक केले. पुंडलिक चव्हाण यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. भास्कर राठोड यांनी सुत्रसंचालन केले. यावेळी विमल राठोड, संगीता राठोड, प्रकाश चव्हाण, राजु राठोड, सुनिल राठोड, किसन राठोड, पांडूरंग पवार, अविनाश शेलार, रामदास राठोड, रोहिदास राठोड आदी उपस्थित होते.
लेखक भालचंद्र नेमाडे यांचा निषेध
लेखक भालचंद्र नेमाडे यांनी आपल्या `हिंदू समृध्द जगण्याची अडगळ' या कादंबरीत बंजारी, लमान समाजातील महिलांविषयी असभ्य भाषेत लिखान केले आहे. त्यामुळे लमान समाजाच्या भावना दुखावल्या आहेत, असे सांगत लमान समाजाच्या वतीने नेमाडे यांच्या लिखानाचा निषेध करण्यात आला.









