43 चित्ररथांचा सहभाग, पारंपरिक गोमंतकीय वैशिष्टय़े व कोविडसंदर्भातील चित्ररथांना जास्त दाद
प्रतिनिधी / मडगाव
गोमंतकीय संस्कृती, पारंपरिक गोमंतकीय व्यवसाय, संगीत, नृत्य यांची सांगड घालणारी चित्ररथ पथके, उत्साहात न्हावून निघालेले प्रेक्षक या सर्वांच्या साथीने रविवारी सायंकाळी फातोर्डात कार्निव्हल साजरा करण्यात आला. खा, प्या व मजा करा असा संदेश त्यात देण्यात आला. यावेळी फातोर्डा परिसर कार्निव्हलमय होऊन गेल्याचे दिसून आले. मिरवणुकीचा आनंद लुटण्यासाठी लोकांची उपस्थिती लक्षणीय होती.
कोविडच्या पार्श्वभूमीवर खबरदारीच्या उपाययोजना राबवून तसेच कोविडसंदर्भातील मार्गदर्शक तत्त्वे पाळून मडगाव पालिकेतर्फे आयोजित या मिरवणुकीला सायंकाळा उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला. यावेळी मडगाव कार्निव्हल समितीचे अध्यक्ष असलेले मुख्याधिकारी आग्नेलो फर्नांडिस, सचिव दिनिज डिमेलो, खजिनदार दामोदर येळेकर, दक्षिण गोवा जिल्हाधिकारी रूचिका कटियाल, उपजिल्हाधिकारी ज्योती कुमारी यांची उपस्थिती होती. यंदाही गेल्या वषीप्रमाणेच कोलवा सर्कलपासून सुरुवात झाली. रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केलेल्या प्रेक्षकांचे मनोरंजन करत सदर चित्ररथ मिरवणुकीची फातोर्डा शिवलिंग देवस्थानासमोरील सुपर स्टोअरच्या ठिकाणी सांगता झाली.
आकर्षक चित्ररथांची भुरळ
एकंदरित 43 चित्ररथांचा यात सहभाग राहिला. एकूण 6 गट त्यासाठी तयार करण्यात आले होते. त्यापैकी पारंपरिक गटात 5, कौटुंबिक गटात 4, क्लाऊन अँड जोकर गटात 17, पुरस्कृत गटात 3, फन अँड जंक गटात 5, तर क्लब व संस्था गटात 9 चित्ररथांचा समावेश राहिला. पारंपरिक बाबींवरील व कोविडसंदर्भातील चित्ररथ या मिरवणुकीचे आकर्षण ठरले. त्यांच्या जोडीला पारंपरिक कोकणी संगीत व पाश्चात्य संगीताच्या तालावर नृत्य करणाऱया पथकांनी उपस्थितांना ठेका धरण्यास भाग पाडले.
क्लाऊन अँड जोकर गटात पर्यावरणास पोषक वाहन, कोविड-19 संदर्भात खबरादारी, कृषी क्रांती, गोमंतकीय धनगर यावर आधारित चित्ररथांनी लक्ष वेधून घेतले. कौटुंबिक गटातील खरे सुपरहिरो, देशाला वाचवा, निसर्गावर प्रेम करा, क्लब व संस्था गटातील गोंयचो कोंबो, ब्लॅक पँथर, हार्मफूल शार्क तसेच पारंपरिक गटात गोंयचो तिंठो, व्हिवा सांज्युआंव, फिनिक्स दि ग्रीन गार्डन या चित्ररथांनी वाहवा मिळविली.
कोविडसंदर्भात आवश्यक खबरदारी यावेळी घेण्यात आली. 65 वर्षांवरील व्यक्तींना व 10 वर्षांखालील मुलांना या मिरवणुकीत प्रवेश दिला जाणार नाही तसेच मास्क परिधान केलेले असणे अनिवार्य असून मास्कविना आढळल्यास 200 रुपयांचा दंड ठोठावण्यात येईल, असे पालिकेच्या समितीकडून जाहीर करण्यात आले होते. याशिवाय 9 ठिकाणी तपासणीसाठी काऊंटर्स खोलण्यात आले होते. निर्जंतुकीकरण करण्याबरोबर तापमान तपासणीसाठी थर्मल गनचा वापर करण्यात आला.









