कार्यकर्ते रस्त्यावर उतरले : सलग दुसऱया दिवशी प्रतिकात्मक पुतळय़ांचे दहन
कुडाळ, कणकवलीत पोलीस बंदोबस्त
कुडाळ पोलीस ठाण्यात पंधराजणांवर गुन्हा
आव्हाने-प्रतिआव्हानांमुळे तणाव वाढण्याची शक्यता
प्रतिनिधी / कणकवली:
इशारे-प्रतिइशाऱयांनंतर शिवसेना-भाजपमध्ये गेल्या दोन दिवसांपासून जिल्हय़ात सुरू झालेला संघर्ष वाढतच चालला आहे. प्रतिकात्मक पुतळय़ांचे दहन शनिवारीही ठिकठिकाणी करण्यात आले. कणकवलीत दंगल नियंत्रण पथक तैनात असतानाही प्रतिकात्मक पुतळय़ाचे दहन करण्यात आले. परस्परांना आव्हाने-प्रतिआव्हानेही देण्यात आली. त्यामुळे तणाव वाढण्याची शक्यता आहे.
शुक्रवारी नीलेश राणे व खासदार विनायक राऊत यांच्या पुतळय़ाचे दहन करण्याचे प्रकार घडल्यानंतर कणकवलीतही पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मात्र या साऱया पार्श्वभूमीवर शहरात पोलीस बंदोबस्त असताना भाजपकडून येथील राणे संपर्क कार्यालयासमोर सर्व्हिस रोडलगत खासदार विनायक राऊत यांच्या प्रतिकात्मक पुतळय़ाचे दहन करीत निषेध करण्यात आला. तसेच राऊत यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
हा संघर्ष यापुढे हा सुरू राहील. आम्हाला अजमावण्याचा प्रयत्न करू नका. आम्ही भारतीय जनता पार्टी व नारायण राणे यांचे जहालमतवादी कार्यकर्ते आहोत, असे संतोष कानडे यांनी सांगितले. यावेळी तालुकाध्यक्ष संतोष कानडे, मिलींद मेस्त्राr, सभापती मनोज रावराणे, शहराध्यक्ष अण्णा कोदे, बबलू सावंत, रमेश पावसकर, संदीप मेस्त्राr, राजन चिके, सोनू सावंत, नगरसेविका मेघा गांगण, पं. स. सदस्या हर्षदा वाळके, सुजाता हळदिवे, प्राची कर्पे, संजना सदडेकर, नगरसेवक शिशीर परुळेकर, संतोष चव्हाण, सदा चव्हाण, सुभाष मालंडकर, पप्पू पुजारे, संजय ठाकूर व अन्य कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते. शनिवारी सकाळपासून शहरात दंगल नियंत्रण पथकाच्या दोन तुकडय़ा असतानाही भाजप कार्यकर्त्यांनी प्रतिकात्मक पुतळय़ाचे दहन केले.
सुकळवाड येथे प्रतिकात्मक पुतळय़ाचे दहन
मालवण : सुकळवाड येथे शनिवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी खासदार विनायक राऊत यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला, अशी माहिती भाजप युवमोर्चा जिल्हा सरचिटणीस बाबा परब व सभापती अजिंक्य पाताडे यांनी दिली. शिवसेनेच्यावतीने शुक्रवारी ओरोस येथे नीलेश राणे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्य़ाची विटंबना करण्यात आली होती. त्यानंतर सावंतवाडी येथे भाजपकडून खासदार विनायक राऊत यांच्या पुतळ्य़ाचे दहन करण्यात आले. कुडाळ येथेही प्रतिक्रिया उमटल्या होत्या. शनिवारी मालवण तालुक्यातही पडसाद उमटले. सुकळवाड येथे सकाळी भाजपच्यावतीने खासदार राऊत यांच्या पुतळय़ाचे दहन करण्यात आले. सभापती अजिंक्य पाताडे, चेतन मुसळे, जगदीश चव्हाण यांच्यासह भाजप पदाधिकारी, युवमोर्चा पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. भाजप प्रदेश सचिव नीलेश राणे हे आमचे नेते आहेत. त्यामुळे त्यांच्या विरोधात कोणतेही वक्तव्य अथवा विरोधी कृती आम्ही ऐकून घेणार नाही. सध्या सुरू असलेल्या वादाच्या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात शिवसेनेने केली. त्यामुळे या संपूर्ण प्रकारास तेच जबाबदार आहेत. भाजपची कृती ही रिऍक्शन आहे. यापुढेही आमचे नेते नीलेश राणे यांच्याबद्दल कोणतेही वक्तव्य अथवा विरोधी कृती सहन केली जाणार नाही, असा इशारा भाजप युवामोर्चा जिल्हा सरचिटणीस बाबा परब व सभापती अजिंक्य पाताडे यांनी दिला आहे.
झाराप तिठा येथे प्रतिकात्मक पुतळय़ाचे दहन
कुडाळ : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर झाराप तिठा येथे कुडाळ तालुका भाजप पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी शनिवारी सकाळी शिवसेना खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक यांच्या प्रतिकात्मक पुतळय़ांचे दहन केले. यावेळी घोषणाबाजी करीत या द्वयींचा निषेध नोंदविला. कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून शहरात भाजप व शिवसेना कार्यालयाकडे पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
दरम्यान, मनाई आदेशाचे उल्लंघन व बेकायदा जमाव केल्याप्रकरणी पोलिसांनी कुडाळ तालुका भाजप अध्यक्षांसह पंधराजणांवर गुन्हा दाखल केला आहे. सायंकाळी उशिरापर्यंत पोलीस त्यांचा शोध घेत होते.
नीलेश राणे यांनी खासदार राऊत यांना धमकी देणारे वक्तव्य केल्याप्रकरणी शिवसेना पदाधिकाऱयांनी पोलीस अधीक्षक यांना निवेदन दिले. तसेच नीलेश राणे यांच्या प्रतिकात्मक पुतळय़ाला चपलांचा हार घालत आक्रमक इशारा दिला. त्याचे पडसाद शनिवारी कुडाळमध्ये उमटले. तालुका भाजपच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी महामार्गावर झाराप तिठा येथे सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास खासदार राऊत व आमदार नाईक यांचे प्रतिकात्मक पुतळे जाळत संतप्त भावना व्यक्त केल्या.
पोलिसांची आंदोलनस्थळी धाव
कुडाळ पोलिसांना ही घटना समजताच निरीक्षक शंकर कोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र हुलावळे, उपनिरीक्षक सागर शिंदे, नितीन कदम व सहकारी तात्काळ तेथे दाखल झाले. मात्र, तेथे आंदोलक नव्हते. पोलिसांनी त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली.
पंधराजणांवर गुन्हा दाखल
पोलिसांना मिळाल्या माहितीनुसार, भाजपचे तालुका अध्यक्ष विनायक राणे, आनंद शिरवलकर, युवामोर्चा सरचिटणीस रुपेश बिडये, महिला मोर्चा जिल्हा सरचिटणीस रेखा काणेकर, नगरसेवक सुनील बांदेकर, नगरसेविका साक्षी सावंत, भाजपाचे सोशल मीडिया अध्यक्ष राजवीर पाटील, दिनेश शिंदे, आनंद लाड, तेर्सेबांबर्डे सरपंच संतोष डिचोलकर यांच्यासह पंधराजणांवर गुन्हा दाखल केला. जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने काल रात्रीपासून जिल्हय़ात 37 (1) (3) नुसार मनाई आदेश जारी करण्यात आला आहे.
बेकायदा जमाव करून मानवी जीवितास धोका निर्माण होईल, असे कृत्य केल्याप्रकरणी भादवि कलम 143, 149 व 285 अन्वये, तर मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 135 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद पोलीस कर्मचारी रुपेश सारंग यांनी दिली.
आंदोलनकर्त्यांचा शोध सुरू
या घटनेमुळे शहरात तणावाची परिस्थिती निर्माण होऊन कायदा-सुव्यवस्था बिघडू नये, म्हणून दंगल नियंत्रणची दोन पथके शिवसेना कार्यालय व भाजप कार्यालय येथे तैनात करण्यात आली आहेत. आंदोलनकर्त्यांचा पोलीस शोध घेत आहेत.









