क्रीडा प्रतिनिधी / मडगाव
सातव्या हिरो इंडियन सुपरलीग फुटबॉल स्पर्धेत आज शनिवारी बांबोळी येथील जीएमसी स्टेडियमवर चेन्नईन एफसी व एफसी गोवा यांच्यात सामना होईल. एफसी गोवा संघाचा हा अवे सामना असेल. एफसी गोवाचे 16 सामन्यांतून पाच विजय, आठ बरोबरी आणि तीन विजयाने 23 गुण झाले आहेत. चेन्नईन एफसीचे 17 सामन्यांतून तीन विजय, आठ बरोबरी व सहा बरोबरीने 17 गुण आहेत.
चेन्नईन एफसीची संधी या स्पर्धेत झपाटय़ाने कमी होत असून ही लढत हरली तर त्यांचे आव्हान संपलेले असेल. विजय मिळाला तर इतर अनेक समीकरणे त्यांच्या पथ्यावर पडणे आवश्यक असेल. प्रशिक्षक क्साबा लॅसझ्लो यांना जे काही सामने उरले आहेत ते जिंकणे अनिवार्य वाटते.
जमशेदपूर एफसीविरुद्ध आम्हाला जिंकण्याची मोठी संधी होती, असे लॅसझ्लो म्हणाले. त्यांना टार्गेटच्या दिशेने केवळ एकच फटका मारता आला, पण आमच्या दुर्दैवाने सेल्फगोल झाला. त्यामुळे अखेरच्या क्षणी आम्हाला पराभव स्वीकारावा लागल्याचे ते म्हणाले. हे अत्यंत वेदनादायक आहे, कारण आम्हाला गोल करण्याची आणि सामना जिंकण्याची उत्तम संधी होती, पण आता जे झाले ते स्वीकारून पुढे जावे लागेल आणि पुढील तीन सामन्यांवर लक्ष करावे लागेल. आम्ही एफसी गोव्याविरुद्ध मैदानावर उतरून क्लबसाठी खेळणे सर्वाधिक महत्वाचे आहे. आमचा संघ अजूनही चांगला आहे, हे दाखवून दय़ावे लागेल, असे लॅसझ्लो म्हणाले.
एफसी गोव्याविरुद्ध काही कमवायचे असेल तर चेन्नईन एफसीला कुठूनतरी गोल करावे लागतील. शॉटच्या बाबतीत त्यांचे दुसरे स्थान आहे. निर्माण केलेल्या संधींच्या बाबतीत ते तिसरे आहेत. परंतू त्यांची कामगिरी निराशजनक झाली असून, त्यामुळे सर्वाधिक कमी गोल त्यांचे आहेत. खेळलेल्या 17 सामन्यांपैकी दहा सामन्यांत त्यांना गोल करता आलेला नाही. हे अपयश भरून काढण्यासाठी एफसी गोवा कदाचित उत्तम प्रतिस्पर्धी असेल, याचे कारण एफसी गोव्याला केवळ दोन क्लीन शीट राखता आल्या आहेत. एफसी गोवाचे प्रशिक्षक जुआन फरांडो यांचे लक्ष्य सोपे आहे. विजय मिळाला तर बाद फेरीच्या दिशेने त्यांचे मोठे पाऊल पडलेले असेल. त्यांचे केवळ तीन सामने बाकी असतील.









