पंडित दीनदयाळ उपाध्याय स्मृतिदिनी पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
सरकार संख्येवर चालू शकते, पण देश चालविण्यासाठी सहमतीचीच आवश्यकता असते, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. ते जनसंघाचे दिवंगत नेते पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या स्मृतिदिनाच्या कार्यक्रमात बोलत होते. उपाध्याय यांचा स्मृतिदिन ‘समर्पण दिन’ म्हणून ओळखला जातो.
उपाध्याय हे आत्मनिर्भर आणि स्वयंपूर्ण भारताचे खंदे समर्थक होते. त्यांचे विचार देशासाठी आजही महत्वाचे आहेत. 1965 च्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धात आपल्या देशाला विदेशी शस्त्रांवर अवलंबून रहावे लागले होते. भारताला आवश्यक असणाऱया शस्त्रास्त्रांची निर्मिती भारतातच झाली पाहिजे, असे त्यावेळी उपाध्याय यांनी सरकारला ठणकावले होते. त्यांनी त्यावेळी जी दूरदृष्टी दाखविली तीच आज भारताला उपयुक्त ठरत आहे, ही आठवण त्यांनी सांगितली.ख
अंत्योदय कार्यक्रमावरही उपाध्याय यांचा भर होता. आजही आपण कोरोनाच्या काळात याच कार्यक्रमाच्या आधारे गरीबांच्या हितरक्षणाची प्रक्रिया पुढे नेत आहोत. आधुनिकतेला उपाध्याय यांचा विरोध नव्हता. आज आपण आधुनिकतेच्या मार्गानेच पुढे जात आहोत. आधुनिक तंत्रज्ञान हा भारताच्या विकासाचा पाया आहे. सरकार याच मार्गाने पुढे जात आहे, असे प्रतिपाद मोदींनी केले.









