पेंटागॉनकडून कृतिदल स्थापन : चीनच्या प्रत्येक आगळीकीला प्रत्युत्तर देणार
वृत्तसंस्था / वॉशिंग्टन
अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी चीनच्या कटांना तोंड देण्यासाठी ठोस तयारी सुरू केली आहे. बायडेन यांनी बुधवारी रात्री चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्याशी चर्चा केली आहे. फोनवरून झालेल्या या संभाषणात बायडेन यांची भूमिका आक्रमक राहिली. चीन आणि अध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्यासाठी अडचणीचे कारण ठरणारा प्रत्येक मुद्दा बायडेन यांनी उपस्थित केला आहे. यात हाँगकाँग आणि उइगूर मुस्लीम यासारखे मुद्देही सामील आहेत.
तर बायडेन यांनी आणखीन एक पाऊल उचलले आहे. बायडेन यांनी अमेरिकेचा संरक्षण विभाग असलेल्या पेंटागॉनच्या तज्ञांचे एक पथक स्थापन केले आहे. हे पथक चीनच्या वाढत्या अरेरावीला रोखण्याकरता व्यूहनीति तयार करणार आहे.
धमकावणी किंवा दबाव टाकण्याच्या प्रत्येक कृत्याला त्याच भाषेत प्रत्युत्तर दिले जाणार असल्याचे बायडेन यांच्यासह अमेरिकेच्या विदेश विभागाने चीनला कळविले आहे. पेंटागॉनचे विशेष कृतिदल यावर अहवाल तयार करत असून यातूनच व्यूहनीति आखण्यात येणार आहे. या व्यूहनीतिवर अमेरिकेचे सैन्य अंमलबजावणी करणार आहे.
चीन कर्जाच्या माध्यमातून छोटय़ा देशांवर दबाव टाकतो आणि त्यानंतर तेथे स्वतःची अरेरावी करतो. अमेरिकेने हा खेळ आता संपुष्टात आणण्याची तयारी सुरू केली आहे. अमेरिकेच्या जनतेच्या भावना आम्ही जाणतो, चीनला आता प्रत्युत्तर दिले जाणार असल्याचे व्हाइट हाउसने म्हटले आहे.
कृतिदलाच्या स्थापनेचा अर्थ
बायडेन यांनी सत्तासुत्रे स्वीकारल्यावर केवळ दोनच विशेष कृतिदल स्थापन केले आहेत. पहिले कृतिदल कोरोना विषाणूविरोधात धोरण तयार करत आहेत. तर दुसरे कृतिदल चीनच्या आव्हानाला सामोरे जाण्याची व्यूहनीति आखत आहे. चीन आमचे तंत्रज्ञान आणि सैन्यांच्या विरोधात बरेच काही करत असून यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे बायडेन यांनी म्हटले आहे. दक्षिण चीन समुद्रात चीनला प्रत्युत्तर देण्यासाठी बायडेन यांनी यापूर्वीच दोन युद्धनौका रवाना केल्या आहेत.
संघर्षाच्या मुद्दय़ांवर चर्चा
अध्यक्ष झाल्यावर बायडेन आणि जिनपिंग यांच्यात झालेल्या पहिल्या संभाषणात अनेक मुद्दय़ांवर चर्चा झाली आहे. बायडेन यांनी हाँगकाँगमधील चीनच्या अडवणुकीच्या भूमिकेवर चिंता व्यक्त करत तेथील स्थिती सुधारण्यावर जोर दिला. अमेरिकेच्या अध्यक्षांनी थेटपणे शिनजियांग प्रांतात उइगूर मुस्लिमांच्या शोषणाचा मुद्दाही उपस्थित केला आहे.









