ऑनलाईन टीम / पुणे :
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी गर्दी टाळून यंदाचा शिवजयंती उत्सव साधेपणाने परंतु उत्साहात साजरा करुया, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले.
शिवनेरी किल्ल्यावर शिवजयंती उत्सव- 2021 साजरा करण्याबाबत जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली जुन्नर पंचायत समिती येथील जिजामाता सभागृहात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी केले. यावेळी आमदार अतुल बेनके, माजी आमदार शरद सोनवणे संबंधित विभागाचे अधिकारी तसेच विविध पक्षाचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, शिवप्रेमी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. देशमुख म्हणाले, यापूर्वी आढावा बैठकीत स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने केलेल्या सूचना विचारात घेऊन राज्य शासनाकडे शिवजयंती साजरी करण्याबाबतप्रस्ताव सादर केलेला आहे. राज्य शासनाकडून शिवजयंती साजरी करण्याबाबत मार्गदर्शक सूचना आल्यानंतर त्यानुसार नियोजन करण्यात येईल. कोरोनाचा धोका अद्याप टळलेला नाही. शिवजयंती साजरी करणे आपल्या सर्वांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. शिवजयंती साजरी करतांना सर्वांनी आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. सॅनिटायझर, मास्क, सोशल डिस्टन्सिंग आदी नियमांचे पालन करुन उत्सव साजरा करावा व प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ.देशमुख यांनी केले.
पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी शिवभक्तांनी शिवज्योत गडावर घेऊन जावू नये. शिवनेरी गडावर मोठया प्रमाणावर गर्दी होऊन कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. राज्य शासनाकडून शिवजयंती साजरी करण्याबाबत मार्गदर्शक सूचना आल्यानंतर त्यानुसार नियोजन करण्यात येईल, असे पोलीस अधीक्षक डॉ. देशमुख म्हणाले.