कुडाळ येथील संत राऊळ महाराज महाविद्यालयाचे आय. टी. क्षेत्रात पदार्पण : विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी थेट आय. टी. कंपनीची स्थापना
- 235 संगणकांसह सहाशे विद्यार्थी , आय. टी. 25 प्राध्यापकांचा जंबो सेटअप
- विविध सॉफ्टवेअर्स व वेबसाईटची निर्मिती सुरू,अनेक कंपन्यांकडून ऑर्डर्स
शेखर सामंत / सिंधुदुर्ग:
केवळ पुस्तकी अभ्यासक्रमात न अडकता मुलांना प्रॅक्टिकल ज्ञान मिळावे, सद्यस्थितीत जगाची मागणी काय आहे, याचा अभ्यास व्हावा व सातत्याने बदलणाऱया आय. टी. तंत्रज्ञानाची ओळख आणि कौशल्य कोकणातील विद्यार्थ्यांना प्राप्त व्हावे, हा हेतू समोर ठेवून कुडाळ येथील संत राऊळ महाराज महाविद्यालयाने सिंधु-जिनस या नावाने स्वत:ची आय. टी. कंपनी स्थापन करीत थेट आय. टी. क्षेत्रात धाडसी पाऊल टाकले आहे. अत्याधुनिक असे 235 संगणक, हायस्पीड ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी, संगणकीय अभ्यासक्रम शिकणारे सुमारे 600 विद्यार्थी, आय. टी. मधील 25 तज्ञ प्राध्यापक असा जम्बो सेटअप घेऊन उभी राहिलेली देशातील ही पहिली कंपनी ठरली आहे.
अल्पावधीत या कंपनीने मार्केटमधील मागणीनुसार विविध शैक्षणिक संस्थांसाठी, शाळा-महाविद्यालयांसाठी, पोलीस डिपार्टमेंटसाठी सॉफ्टवेअर्स तसेच स्थानिक उद्योगांसाठी वेबसाईटस्, सर्व्हिस सॉफ्टवेअर्सदेखील बनवण्यात यश मिळवले आहे. सिंधुदुर्गच्या शिक्षण आणि उद्योग क्षेत्रात ही फार मोठी उपलब्धी म्हणून याकडे पाहिले जात आहे.
कुठल्याही खासगी उद्योगक्षेत्रात नोकरी मिळवताना तुमच्याकडे असलेल्या डिग्री अथवा चांगल्या मार्कस्पेक्षा तुमच्याकडे असलेला अनुभव व कौशल्याला अधिक महत्व दिलं जातं. पुस्तकी ज्ञानाबरोबरच आपण स्किल्स मिळवली, तर ती करिअरच्या दृष्टीने अधिक उपयोगाची ठरतात. तुम्ही शिकला किती, त्यापेक्षा तुम्हाला येतं किती, याला उद्योगक्षेत्रात जास्त महत्व असतं. आय. टी. क्षेत्राबाबत विचार केला, तर कोकणातील मुलं हुशार असली, तरी या कोकणात आय. टी. इंडस्ट्री नसल्यामुळे इंटरन्सशिपच्या माध्यमातून शिकता शिकता मिळवलं जाणारं कौशल्य व अनुभव फारसा त्यांच्या वाटय़ाला येत नाही. त्यामुळे इंटरह्यूला गेल्यानंतर त्यांना अनुभवाबाबत विचारले असता ही मुलं काहीही सांगू शकत नाहीत व त्यामुळे ती मागे पडतात. नेमकी हीच उणीव लक्षात घेऊन आय. टी. क्षेत्रातील तज्ञ भाईसाहेब तळेकर यांच्या सल्ल्यानुसार कुडाळ येथील या संत राऊळ महाराज महाविद्यालयाने स्वत:ची सॉप्टवेअर कंपनी उभारण्याचा धाडसी निर्णय घेतला आणि तो अमलातही आणला. अशा रितीने ‘सिंधु जीनस टेक्नॉलॉजी’ नावाने महाविद्यालयाने स्थापन केलेल्या देशातील पहिल्या कंपनीचा उदय झाला.
विद्यार्थ्यांच्या करियरचा विचार करून निर्णय
देशातील या पहिल्या आय. टी. कंपनीबाबत तरुण भारतशी बातचीत करताना महाविद्यालयाचे प्राचार्य सिद्धेश्वर देसले म्हणाले, नफा मिळविण्यापेक्षा विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल व्हावे, या उद्देशाने महाविद्यालयाने हे पाऊल उचलले आहे. एखाद्या मोठय़ा आय. टी. कंपनीचा जेवढा सेटअप असतो तेवढा मोठा व अत्याधुनिक सेटअप महाविद्यालयापाशी आहे. या कंपनीसाठी लागणारे तज्ञ मनुष्यबळ विद्यार्थ्यांच्या आणि प्राध्यापकांच्या रुपात उपलब्ध आहे. या महाविद्यालयात कम्प्युटर सायन्स आणि बी. एस. सी. आय. टी. असे दोन अभ्यासक्रम शिकवले जातात. सध्या या दोन्ही विभागात मिळून सुमारे 600 विद्यार्थी संगणकीय ज्ञान घेत आहेत. नेमका या बळाचा वापर करीत कंपनी उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. या कंपनीच्या माध्यमातून बनवण्यात येणारी सॉप्टवेअर्स, वेबसाईटससारखी प्रॉडक्ट विकून येणाऱया पैशातून प्राध्यापकांना पगार, विद्यार्थ्यांना इन्सेन्टिव्ह आणि इन्फ्रास्टक्चरचे भाडे भागवण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. मात्र हे जरी खरे असले तरी या कंपनीच्या माध्यमातून आमच्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव मिळावा, त्यांच्यात कौशल्यगुण निर्माण व्हावेत आणि सद्यस्थितीत आय. टी. जगात सुरू असलेल्या घडामोडींचे ज्ञान विद्यार्थ्यांना व्हावे, हा शुद्ध हेतू असल्याचे ते म्हणाले.
भविष्यात कंपनी मोठय़ा उद्योगात परावर्तीत झाल्यास आश्चर्य नको – प्रा. केरवडेकर
देशातील या पहिल्या आय. टी. कंपनीच्या यशस्वीपणे लाँच करण्यात आलेल्या उत्पादनाबाबत बोलताना या कंपनीचे संचालक प्रा. प्रशांत केरवडेकर म्हणाले, या कंपनीने महाविद्यालय, हायस्कूलसारख्या शैक्षणिक संस्थांसाठी लागणारी इन्स्टिटय़ूशन मॅनेजमेंट सारखी सॉफ्टवेअर्स बनवली आहेत. या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून विद्यापीठ म्हणा वा एखाद्या बडय़ा कंपनीच्या कार्यालयाचे मॅनेजमेंट एका क्लिकवर करता येऊ शकते, असे ते म्हणाले. सिंधुदुर्ग पोलिसांनी संपूर्ण जिल्हय़ात लावलेल्या 480 सीसीटीव्ही कॅमेऱयांचे नियोजन, त्याचे रोजच्या रोज रिपोर्टस् एका क्लिकवर अचूकपणे मिळवून देणारे सॉफ्टवेअर बनवण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. कुडाळ एम. आय. डी. सी. येथील बांबूपासून कलात्मक वस्तू, फर्निचर व स्ट्रक्चर बनवणाऱया चिवार या कंपनीसाठी त्यांचे प्रॉडक्ट विकण्याकरीता ऍमेझॉनसारखी वेबसाईट देखील बनवून दिल्याचे त्यांनी सांगितले. या व्यतिरिक्त याच कुडाळातील ‘माय सोलर’ कंपनीसाठी सर्व्हिस सॉफ्टवेअर व कमर्शियल वेबसाईट बनवून दिली. कुडाळ खरेदी-विक्री संघासाठी सॉफ्टवेअर बनवून दिले. या व्यतिरिक्त मुंबईतील अनेक कंपन्यांचे प्रोजेक्टस् आता या कंपनीकडे येऊ लागले असल्याची माहितीही त्यांनी दिली. महाविद्यालयाचे व्यवस्थापन आणि संस्थेच्या सहकार्यातून हे सर्व सत्यात उतरवल्याचे त्यांनी सांगितले. भविष्यात आय. टी. तील या कंपनीरुपी रोपटय़ाचे मोठय़ा वटवृक्षात रुपांतर झाल्यास आश्चर्य वाटायला नको, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.









