बळकट संबंधांचा दावा : भारत सर्वात महत्त्वाचा सहकारी
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
अमेरिकेने भारताला महत्त्वाचा सहकारी संबोधिले आहे. जो बायडेन प्रशासनाने सत्तासुत्रे स्वीकारल्यावर अमेरिकेचा विदेश विभाग स्वतःच्या नव्या विदेश धोरणाला आकार देऊ लागला आहे. जागतिक महासत्ता म्हणून भारताच्या उदयाचे स्वागत करत असल्याचे विदेश विभागाने म्हटले आहे.
अमेरिकेच्या विदेश विभागाचे प्रवक्ते नेड प्राइस यांनी मंगळवारी रात्री दैनंदिन ब्रीफिंगमध्ये भारताचा उल्लेख केला आहे. हिंद आणि प्रशांत महासागर क्षेत्रात भारत आमचा महत्त्वाचा सहकारी आहे. एक जागतिक महासत्ता म्हणून भारताच्या उदयाचे आम्ही स्वागत करतो. भारत या क्षेत्राला सुरक्षित ठेवण्यास मोठी भूमिका पार पडत असल्याचे प्राइस म्हणाले.
भारत आणि अमेरिका कूटनीतिक आणि सुरक्षेच्या सर्व मुद्दय़ांवर मिळून काम करत राहिले आहेत, दोन्ही देशांचे संबंध आता पूर्वीपेक्षा अधिक दृढ केले जातील. दोन्ही देशांमधील सहकार्याची व्याप्ती खूपच मोठी असल्याचे प्राइस यांनी म्हटले आहे.
संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषदेत भारताच्या अस्थायी सदस्यत्वाचे अमेरिकेने स्वागत केले आहे. दोन्ही देशांची सामरिक भागीदारी नवी उंची गाठणार असल्याचे मानत असल्याचे प्राइस यांनी सांगितले आहे.
चीनसोबतचा तणाव
भारत आणि चीन यांच्यात मागील वर्षापासून प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तणाव आहे. लडाखच्या अनेक क्षेत्रांमध्ये दोन्ही देशांचे सैन्य कित्येक महिन्यांपासून समोरासमोर उभे ठाकले आहे. अमेरिका या प्रकरणी अत्यंत बारकाईने नजर ठेवून आहे. स्थिती तणावपूर्ण असल्याचे आम्ही जाणतो. भारत आणि चीन चर्चा करत आहेत. याप्रकरणी परस्पर सहमतीने शांततापूर्ण तोडगा काढला जावा अशी अमेरिकेची इच्छा आहे. शेजारी देशांप्रकरणी चीन कशाप्रकारचा हस्तक्षेप करतो हे अमेरिका चांगलेच ओळखून असल्याचे प्राइस म्हणाले.









