मेडिकल कॉलेजच्या उद्घाटनाच्या निमित्ताने राणेंनी एका दगडात अनेक पक्षी मारल्याचे स्पष्ट होत आहे. त्याचे परिणाम आगामी काळात निश्चितच दिसून येतील.
भाजपचे नेते खासदार नारायण राणे यांनी आपल्या मेडिकल कॉलेजच्या उद्घाटनाला भाजपचे राष्ट्रीय नेते, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना आणून शक्तिप्रदर्शन केले आणि आपली राजकीय ताकद दाखवून दिली. अमित शहा यांनीही राणेंचा मान सन्मान करणार, असे जाहीरपणे सांगितले. त्यामुळे राणेंना केंद्रीय मंत्रिपद मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.
नारायण राणे यांच्या सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाच्या सिंधुदुर्ग जिल्हय़ातील पडवे येथील मेडिकल कॉलेजचे उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते रविवारी झाले. या उद्घाटन सोहळय़ास माजी मुख्यमंत्री व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत अशी अनेक दिग्गज नेतेमंडळी उपस्थित होती. या दिग्गजांच्या उपस्थितीने राणेंनी शक्तिप्रदर्शन करून आपली ताकद दाखवून दिली. मेडिकल कॉलेजच्या उद्घाटनाच्या निमित्ताने राणेंनी एका दगडात अनेक पक्षी मारल्याचे स्पष्ट होत आहे. त्याचे परिणाम आगामी काळात निश्चितच दिसून येतील. मेडिकल कॉलेजच्या उद्घाटनाला देशाच्या दोन नंबरच्या राष्ट्रीय नेत्याला आणून एका दगडात अनेक पक्षी मारत असताना राष्ट्रीय नेत्यामुळे हे मेडिकल कॉलेज संपूर्ण देशभरात चर्चेत आणले. दुसरे म्हणजे आपली राजकीय ताकद दाखवून दिली आणि तिसरे महत्त्वाचे म्हणजे पक्षात राणेंना मानसन्मान दिला जाईल, असे अमित शहा यांनी जाहीर केले. त्यामुळे केंद्रात मंत्रिपद मिळणार, अशी शक्यता निर्माण झाली आहे. अमित शहा यांच्या बोलण्यातून तसे संकेतही मिळाले आहेत. नारायण राणे यांची एक आक्रमक नेता म्हणून ओळख आहे. मोठी महत्त्वाकांक्षा नेहमी बाळगून असणाऱया राणे यांचा राजकीय प्रवास पाहिला तर शिवसेनेमध्ये असताना ते शाखाप्रमुख पदापासून मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचले. त्यानंतर विरोधी पक्ष नेतेपदही मिळाले. शिवसेनेला राम राम करत काँग्रेसमध्ये गेले. तेथेही त्यांना मंत्रिपद मिळाले. परंतु त्यांना मुख्यमंत्रीपदाची मोठी आशा होती. त्यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले. काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधींना सिंधुदुर्गात आणण्याची किमया केली. त्यावेळी राणेंची राजकीय ताकदही मोठी होती. परंतु, शिवसेनेच्या संस्कारात मोठे झालेल्या राणेंना काँग्रेसची कार्यपद्धती रुचेना आणि मुख्यमंत्रीपदही मिळणे कठीण आहे, हे लक्षात आल्यावर त्यांनी भाजपमध्ये जाण्यासाठी दरवाजा खटखटायला सुरुवात केली.
भाजपने त्यांची ताकद पाहून भाजपमध्ये प्रवेश दिला. 1990 मध्ये नारायण राणे सिंधुदुर्गात कणकवली विधानसभा मतदारसंघातून निवडून आल्यानंतर 25 वर्षे त्यांनी मागे वळून पाहिले नाही. प्रत्येकवेळी विजयी होत गेले. परंतु, 2014 च्या निवडणुकीत त्यांना पराभवाचा धक्का बसला, त्यांचे मोठे सुपुत्र नीलेश राणे यांनाही खासदारकीच्या निवडणुकीत पराभवाचा धक्का बसला आणि राणेंच्या राजकीय वर्चस्वाला धक्काच बसला. त्यामुळे राणेंची ताकद कमी होत चालली, असेच वाटू लागले. परंतु, राणेंनी आपला आत्मविश्वास कमी होऊ दिला नाही. दुसरीकडे त्यांचे दुसरे सुपुत्र नीतेश राणे 2014 आणि 2019 च्याही निवडणुकीत आमदार म्हणून निवडून आले आणि पुन्हा एकदा आपली ताकद निर्माण करायला सुरुवात केली. भाजपमध्ये आल्यावर भाजपची केंद्रात सत्ता असल्याने त्यांचे राजकीय बळ वाढू लागले.
मेडिकल कॉलेजच्या उद्घाटनाला राष्ट्रीय नेत्यांना आणणे सोपे नाही. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्घाटनाला येणार, असे महिनाभरापूर्वी जाहीर केले तेव्हा शहा येतील की नाही, याबाबत साशंकता होती. 6 फेब्रुवारीचा दौरा रद्द झाल्यावरही अनेकांनी शहा येणार नाहीत, असे म्हटले होते. मात्र 6 जानेवारीला शेतकरी संघटनांनी देशभर पुकारलेल्या चक्का जाम आंदोलनामुळे ते आले नव्हते. दुसऱया दिवशी आपले नियोजित कार्यक्रम बाजूला ठेवून शहा हे मेडिकल कॉलेजच्या उद्घाटनाला आले. त्यामुळे राणे यांची राजकीय ताकद पुन्हा एकदा सिद्ध झाली.
शहा यांना आणून राणेंनी जसे एका दगडात अनेक पक्षी मारण्याचे काम केले, तसे भाजपनेही शिवसेनेवर निशाणा साधण्याचे काम मेडिकल कॉलेजच्या उद्घाटनाच्या निमित्ताने केले. मेडिकल कॉलेजच्या उद्घाटन कार्यक्रमात राजकीय भाष्य कोण करणार नाही, असे वाटत होते आणि आपापल्या भाषणात बोलतानाही आम्हाला राजकीय भाष्य करायचे नाही, असे सांगून स्वतः राणेंसह देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांनी शिवसेनेवर प्रहार करायचे सोडले नाही.
विधानसभा निवडणुकीत भाजपला सर्वाधिक जागा मिळूनही मुख्यमंत्रीपदाच्या वादावरून भाजपला शिवसेनेने सत्तेपासून दूर ठेवले, याचे शल्य भाजपच्या नेत्यांच्या मनामध्ये आहे. हे शल्य या कार्यक्रमात त्यांनी बोलून दाखवले. महाविकास आघाडी सरकार येऊन सव्वा वर्ष झाले. या सव्वा वर्षानंतर आम्ही शिवसेनेला मुख्यमंत्रीपद देण्याचे वचन दिले नव्हते, असे अमित शहा यांनी सांगत शिवसेनेवर हल्ला चढवला. शिवसेनेला लक्ष्य करतानाच त्यांनी राणेबद्दल बोलताना राणे हे एक असे नेते आहेत, त्यांना अन्याय सहन होत नाही. म्हणूनच त्यांना अन्यायाविरुद्ध बोलल्यामुळे शिवसेना व काँगेस पक्षातून बाहेर पडावे लागले. मात्र भाजपमध्ये तसे होणार नाही. त्यांच्यावर अन्याय होऊ देणार नाही. त्यांचा मान सन्मानच केला जाईल, असे सांगितले. त्यांच्या या वक्तव्याने राणेंना केंद्रात मंत्रिपद मिळेल, याचे संकेत मिळाले. परंतु, शहा हे राजकारणातील धूर्तपणा दाखवत शिवसेनेशी दोन हात करणारा मोहरा म्हणून राणेंनाच पुढे करीत असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पुन्हा एकदा शिवसेना विरुद्ध राणे यांच्यातील वाद उफाळत राहणार, हे निश्चित. आगामी काळामध्ये जि.प., जिल्हा बँक, सहकारी संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. जर राणेंना मंत्रिपद मिळाले, तर नक्कीच त्याचा फायदा या निवडणुकांमध्ये होऊ शकतो. तसेच राज्यातील सरकार अस्थिर करण्यासाठी राणे यांच्यासारख्या मोहऱयाचा वापर होऊ शकतो. त्यामुळेच कदाचित शहा यांनी राणेंचा सन्मान करण्याचे जाहीर करून भाजपकडून ताकद पुरविणार असल्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे आगामी काळात शिवसेनेसह विरोधकांना राणेंना सामोरे जावे लागणार आहे, हे निश्चित.
संदीप गावडे









