कांदळगाव येथे दुचाकी-बोलेरो पिकअप धडक : दोन्ही वाहनांचेही मोठे नुकसान
प्रतिनिधी / मालवण:

मालवण-हडी मार्गावरील कांदळगाव राणेवाडी फाटय़ानजीकच्या उताराच्या रस्त्यावर दुचाकी व चारचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार राजेश नारायण बांदेकर (30, रा. तारकर्ली मधलीवाडी) हा जागीच ठार झाला. हा अपघात सकाळी 7.45 च्या सुमारास झाला. यात दोन्ही गाडय़ांचे नुकसान झाले. बोलेरो पिकअपचा टायरही फुटला, तर दुचाकीचा चेंदामेंदा झाला होता.
तारकर्ली येथील राजेश बांदेकर हा टीव्हीएस आपाची मोटरसायकल (एमएच 07 आर 5607) घेऊन आचरा येथून मालवणच्या दिशेने येत होता, तर चारचाकी गाडी (एमएच 07 एजे 1371) मालवणहून आचऱयाच्या दिशेने जात होती. यात कांदळगाव फाटय़ानजीकच्या उताराच्या रस्त्यावर या दोन्ही वाहनांमध्ये जोरदार धडक बसली. यात दुचाकीस्वार राजेश बांदेकर याचा जागीच मृत्यू झाला. अपघातात दोन्ही गाडय़ांचे मोठे नुकसान झाले. येथील शासकीय-निमशासकीय कर्मचारी ग्राहक भंडारच्या मालवणी बझारची बोलेरो पिकअप टेंपो फिरत्या बझारला घेऊन जात असताना हा अपघात झाला. बोलेरो गाडी कृष्णा वसंत पुजारे (41, रा. धुरीवाडा) हा चालवित होता. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. रुग्णवाहिकेला पाचारण करण्यात आले होते. पोलीस पाटील शीतल परब यांनी अपघाताची माहिती पोलिसांना दिली. त्यानुसार पोलीस निरीक्षक एस. एस. ओटवणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन पाटील, हेमंत पेडणेकर, सुहास पांचाळ घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह विच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. पोलिसांकडून तपास सुरू आहे. स्थानिक ग्रामस्थांनी यावेळी सहकार्य केले.
तारकर्लीतील ग्रामस्थांची गर्दी
राजेश हा आपल्या मामाच्या घरी म्हणजे तांबळडेग (ता. देवगड) येथे गेला होता. तेथून तो सकाळी तारकर्ली येथे येण्यासाठी निघाला होता. वाटेत हा अपघात झाला. या अपघातात राजेशच्या तोंडावर मुखपट्टी असल्याने त्याची ओळख पटविणे कठीण झाले होते. त्याच्या अंगात तारकर्ली विठ्ठल मंदिरचे टी-शर्ट होते. त्यावरून तो तारकर्ली येथील असल्याचे बोलले जात होते. मात्र, तारकर्लीतील व्यक्ती सकाळीच मालवण-आचरा रोडवर कशी? यामुळे संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, राजेशच्या मोबाईलवर फोन आल्यानंतर तो मृतदेह राजेशचाच असल्याचे स्पष्ट झाले. ही माहिती तारकर्लीत समजताच तेथील ग्रामस्थांनी घटनास्थळी आणि विच्छेदन कक्षाकडे गर्दी केली होती.
वाढलेल्या झाडींमुळे अपघाताची शक्यता
मालवण-आचरा मार्गावर झाडी मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. बांधकाम विभागाकडून या रस्त्याची झाडींची अद्याप साफसफाई करण्यात आलेली नाही. अपघात घडला, तेथे असलेल्या वळणाच्या रस्त्यावर समोरून येणाऱया वाहनांचा अंदाज चुकण्याची शक्यता आहे. याठिकाणी मोठय़ा प्रमाणात झाडी वाढलेली आहे. बांधकाम विभागाच्या या कारभारावर उपस्थित ग्रामस्थांतून नाराजी व्यक्त करण्यात येत होती. तसेच तातडीने रस्त्याची झाडी तोडण्याची मागणी होत होती.
वडिलांनी फोडला टाहो
राजेशचा अपघात झाल्याची माहिती त्याच्या आई-वडिलांना देण्यात आली होती. वडील विच्छेदन कक्षाकडे आल्यानंतर रुग्णवाहिकेमध्ये राजेशचा मृतदेह पाहून त्यांनी टाहो फोडला. वडिलांचा आक्रोश पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले. राजेशच्या पश्चात आई-वडील, बहीण असा परिवार आहे. राजेश हा मासेमारी आणि स्कुबा ड्रायव्हर होता. बांदेकर कुटुंबियांचा तो आधार होता.









