वार्ताहर / काकती
नेहरूनगर येथील केएलईएस डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पिटलसमोरील सर्व्हिस रस्त्यावर वाहने पार्किंग केली जात असल्याने रहदारीची प्रचंड कोंडी होत आहे. परिणामी या रस्त्यातून मार्गक्रमण करीत असताना लहान-मोठे अपघात घडत आहेत. वरिष्ठ रहदारी पोलीस अधिकाऱयांनी प्रत्यक्ष पाहणी करून पार्किंगची सोय अन्यत्र करावी, अशी मागणी होत आहे.
काकतीहून जाणारा हा सर्व्हिस रस्ता बेळगावचे प्रमुख प्रवेशद्वार राणी कित्तूर चन्नम्मा सर्कलकडे जातो.
या सर्व्हिस रस्त्यावरून मोठय़ा प्रमाणात स्थानिक नागरिक, प्रवासी व केएलई हॉस्पिटलला जाणाऱया रुग्णांची सारखी वर्दळ चालू असते. प्रामुख्याने या हॉस्पिटलला जाणारे रुग्ण, संबंधित भेट देणारी टू व्हिलर, फोर व्हिलर कार, रुग्णवाहिका यामुळे रहादारीची कोंडी झालेली दिसून येते. या प्रमुख रस्त्याच्या समोरील फूटपाथसमोर टू व्हिलर गाडय़ा सर्व्हिस रस्त्यावर पार्क करण्यात येत आहेत. बेळगावकडे जाणाऱया सर्व्हिस रस्त्यावरदेखील फोर व्हिलर कार, रुग्णवाहिका पार्किंग केलेल्या दिसून येतात. जवळपास हजार फुटापर्यंत पार्किंग केलेल्या गाडय़ा विभाजन केलेल्या सर्व्हिस रस्त्यावर पार्किंग केलेल्या असतात. अशा परिस्थितीत परिवहन मंडळाच्या बसगाडय़ा व इतर सर्व प्रवासी गाडय़ांची रहदारी चालू असते.
अशा रहदारीतून या रस्त्यातून मार्गक्रमण करणे म्हणजे तारेवरची कसरत आहे. रस्त्यातील अडथळे पार करून जात असताना या अरुंद रस्त्यात लहान-मोठे अपघात घडत आहेत. याची गांभीर्याने बेळगाव पोलीस कमिशनर व रहदारी पोलीस अधिकाऱयांनी पाहणी करून रस्त्यावर करण्यात येणारे पार्किंग हटवावे, अशी मागणी होत आहे