प्रतिनिधी/ चिपळूण
तब्बल 20 वर्षे गोवळकोट येथील मैदानात जाणाऱया सांडपाण्याचा प्रश्न सोमवारी निकाली निघाला आहे. यासाठी कारणीभूत ठरणाऱया दोन घरांच्या संरक्षण भिंतींवर नगर परिषदेने जेसीबी फिरवला आहे. त्यामुळे गटार बांधणीचा मार्गही मोकळा झाला आहे.
गोवळकोट येथे नगर परिषदेचे खेळाचे मैदान आहे. मात्र शिंदेवाडीतून येणारे सांडपाणी गेल्या 20 वर्षापासून या मैदानात जात होते. या पाण्यामुळे मोठय़ाप्रमाणात उगवणारी झाडे उगवत होती. त्यामुळे मैदानात खेळणे कठीण झाले होते. यामुळे मैदानाच्या बाजूंनी गटार बांधण्याची मागणी नागरिक करीत होते. मात्र येथील दोन घरांच्या संरक्षण भिंतीमुळे गटार बांधणे कठीण बनले होते. अखेर नगर परिषदेने संबंधित मालकांना नोटीस धाडून हे अतिक्रमण काढण्यास सांगितले होते. मात्र ते तोडले जात नव्हते.
सोमवारी मुख्याधिकारी डॉ. वैभव विधाते यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासकीय अधिकारी अनंत मोरे, नगर अभियंता परेश पवार, बांधकाम विभागाचे विनायक सावंत हे जेसीबी, वाहने व कर्मचाऱयांच्या फौजफाटय़ासह गोवळकोट येथे दाखल झाले. यावेळी संबंधित मालकांनी काही दिवसांची मुदत मागून विरोध करण्याचा प्रयत्न केला. मात्र नगर परिषदेने या संरक्षण भिंती जमिनदोस्त करून सांडपाण्याचा प्रश्न मार्गी लावला आहे. त्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
गतवर्षी लाखो रूपये खर्च करून येथे गटार बांधणीच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला होता. मात्र या संरक्षण भिंतींसह अन्य कारणांमुळे हे काम सुरू झालेले नाही. आता या भिंतीच जमिनदोस्त झाल्याने गटार बांधणीचा मार्ग मोकळा झाला असून लवकरच या कामास प्रारंभ होणार असल्याचे नगर परिषदेकडून सांगण्यात आले. गटाराचे काम पूर्ण झाल्यावर मैदानाच्या कामासही सुरूवात होण्याची शक्यता आहे.









