आंतरजिल्हा बदली घेऊन आलेल्या शिक्षकांना मिळाल्या शाळा
प्रतिनिधी / सातारा :
तब्बल सात महिने स्वतःच्या जिह्यात येवूनही शाळा मिळत नव्हती. संघटनांच्या वादामुळे शासन निर्णय असूनही अन्याय होत होता. शिक्षकांच्या पाठपुराव्यामुळे आज प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात ऑनलाईन प्रक्रिया पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या सुचनेनुसार पारदर्शकपणे पार पडली. शिक्षकांना शाळा मिळाल्याने बहुतांशी शिक्षकांनी आनंदाश्रू ढाळले. विस्थापितच्या नावाखाली बदल्या हव्यात म्हणून मागणी करणाऱ्या अनेक संघटना चौथ्या मजल्यावर घुटमळत होत्या. हालचाली टिपत होत्या. परंतु त्यांची वाऱ्यावरची वरात झाली.
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले यांच्या अध्यक्षतेखाली व शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे, कृषी सभापती मंगेश धुमाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात आंतरजिल्हा बदली होवून आलेल्या शिक्षकांना समुपदेशानाने शाळा देण्याची प्रक्रिया पार पाडली. यामध्ये प्रथम प्राधान्य स्तनदा व गरोदर माता यांना देण्यात आले.
जिह्यात शिक्षकांच्या 827 जागा रिक्त आहेत. जेथे शुन्य शिक्षक आहेत तेथेच शाळा काढण्यात आल्या होत्या. त्यामध्ये बाहेरुन आलेल्या 124 शिक्षकांना पदस्थापना ऑनलाईन इन कॅमेऱ्यात देण्यात आली. यामध्ये 41 महिला तर पाच एसटी महिला, 65 पुरुष तर 13 नवीन पुरुष यांचा समावेश होता. विशेष म्हणजे यातील बहुतांशी शिक्षकांनी आपल्याला दुर्गम शाळा देण्यात यावी, अशी मागणी केली होती. त्यानुसार दुर्गम शाळा दिल्या गेल्या असून महाबळेश्वर, पाटण या तालुक्यातील शाळांना शिक्षक मिळाले आहेत. सेवा ज्येष्ठतेनुसार बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यांना नियुक्तीचे आदेशही आजच देण्यात आले.