मुंबईतील व्यावसायिकाला पोलीस मुख्यालयात कोंडल्याप्रकरणी कारवाई : जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही होता आरोप
प्रतिनिधी / बेळगाव

शिनोळी येथील एका कारखान्याच्या व्यवहारासंबंधी मुंबईतील व्यावसायिकाला पोलीस मुख्यालयात कोंडून त्याच्या नावावरील शेअर्स इतर भागीदारांकडे वर्ग करण्यासाठी जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या आरोपावरून पोलीस निरीक्षकासह सहा जणांविरुद्ध अखेर एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
मार्केट पोलीस स्थानकात शनिवारी रात्री यासंबंधी भादंवि 143, 147, 342, 506, सहकलम 149 अन्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. मुंबई येथील गिरीश तुकाराम हुद्दार (वय 53) या व्यावसायिकाने दिलेल्या फिर्यादीवरून ही कारवाई करण्यात आली आहे.
दीपक परशराम बिर्जे रा. वडगाव, डीएसबी विभागाचे पोलीस निरीक्षक कुबेर एस. रायमाने, शिवानंद रा. शिरगुप्पी, जीवन परशराम बिर्जे रा. वडगाव, विजय पावशे रा. वडगाव यांच्यासह काही अनोळखी पोलिसांवरही एफआयआर दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर तब्बल तीन महिन्यांनी एफआयआर दाखल झाला आहे.
शिनोळी येथील वैजनाथ इंडस्ट्रीज प्रा.लि. या कारखान्याच्या व्यवहारासंबंधी गिरीश तुकाराम हुद्दार यांना 29 ऑक्टोबर 2020 रोजी पोलीस मुख्यालयातील डिस्ट्रिक्ट स्पेशल ब्रँच विभागात कोंडून ठेवण्यात आले होते. सकाळपासून सायंकाळपर्यंत बेकायदा कोंडून ठेऊन शेअर्स इतर भागीदारांच्या नावे हस्तांतरित करण्यासाठी जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती, असा फिर्यादीत उल्लेख करण्यात आला आहे.
तब्बल तीन महिने गिरीश हुद्दार यांनी पोलीस निरीक्षकांपासून पोलीस आयुक्तांपर्यंत अधिकाऱयांची भेट घेऊन आपली कैफियत मांडूनही त्यांची फिर्याद दाखल करून घेण्यास टाळाटाळ करण्यात येत होती. त्यामुळे मुख्यमंत्री, गृहमंत्री, राज्य पोलीस महासंचालकांसह वरि÷ पोलीस अधिकाऱयांना पत्रे पाठवून त्यांनी आपल्यावरील अन्यायाची माहिती दिली होती.
प्रत्यक्षात 2 नोव्हेंबर 2020 पासून त्यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा करूनही पोलिसांनी एफआयआर दाखल करून घेण्यास टाळाटाळ केली होती. गिरीश हुद्दार यांच्या तक्रारीची दखल घेत बेळगाव उत्तर विभागाचे पोलीस महानिरीक्षक राघवेंद्र सुहास यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचा आदेश दिला होता. अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख अमरनाथ रेड्डी यांच्याकडे चौकशीची जबाबदारी सोपविण्यात आली होती. त्यांनी दिलेल्या अहवालावरून 6 जानेवारी 2021 रोजी पोलीस निरीक्षक कुबेर एस. रायमाने यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.
देर आए, दुरुस्त आए!
आता या प्रकरणी एफआयआर दाखल झाला आहे. तब्बल तीन महिने पोलिसांनी फिर्याद दाखल करण्यास टाळाटाळ का केली? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या प्रकरणात पोलीस अधिकाऱयांची भूमिका संशयास्पद असून संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीनंतर आणखी काही अधिकाऱयांवर कारवाई होण्याची शक्मयता आहे.









