प्रतिनिधी/ सातारा
देशी बनावटीच्या पिस्तुलासह तीन जिवंत काडतुसे हस्तगत करत दोन जणांना अटक करण्यात सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले. त्यांच्याकडून 65 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अमोल जगन्नाथ माने (वय 20, रा. वनवासमाची, ता. कराड), संभाजी संपत मदने (रा. बनवडी कॉलनी, ता. कराड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांनी सातारा जिह्यात बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱया इसमांची माहिती प्राप्त करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ यांना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने किशोर धुमाळ यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, आनंदसिंग साबळे यांच्या अधिपत्याखाली एक विशेष पथक तयार केले होते.
दि. 6 फेब्रुवारी रोजी किशोर धुमाळ यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, एक इसम सुर्ली, ता. कराड, जि. सातारा गावच्या बसस्टॉप जवळील परिसरामध्ये गावठी पिस्तूलसह फिरत आहे. धुमाळ यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला संबंधित इसमावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.
सायंकाळी पथकाने सुर्ली येथे त्या संशयिताला ताब्यात घेतले असता त्याच्याकडे एक गावठी पिस्तूल व तीन जिवंत काडतुसे असा एकूण 65 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. तो हस्तगत करून त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने हे पिस्तूल व काडतूस दुसऱया एका इसमाने त्याच्याकडे ठेवण्यात दिले असल्याचे सांगितले.
संशयिताने ज्याचे नाव सांगितले त्या इसमावर कराड पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल असून नोव्हेंबर 2020 महिन्यापासून फरार होता. तो आरोपी सध्या वांगी, जि. सांगली येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सदर ठिकाणी जावून सापळा लावून त्यास शिताफीने ताब्यात घेतले. अमोल माने व संभाजी मदने या दोन्ही आरोपीविरुध्द कराड तालुका पोलीस ठाण्यास भारतीय शस्त्र अधिनियमाप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे व आनंदसिंग साबळे तसेच सहाय्यक फौजदार जोतीराम बर्गे, उत्तम दबडे, हवालदार सुधीर बनकर, अतिश घाडगे, संजय शिर्के, विजय कांचळे, संतोष सपकाळ, पोलीस नाईक शरद बेबले, साबीर मुल्ला, प्रविण फडतरे, निलेश काटकर प्रमोद सावंत, अमित सपकाळ, गणेश कचरे, मुनीर मुल्ला, गणेश कापरे, विक्रम पिसाळ, रविंद्र वाघमारे, मंगेश महाडीक, अर्जुन शिरतोडे, अजित कर्णे, राजकुमार ननावरे, रोहित निकम, सचिन ससाणे, मयूर देशमुख, मोहसीन मोमीन, केतन शिंदे यांनी सहभाग घेतला होता.








