लव्हरबॉयच्या भूमिकेत प्रभास, व्हॅलेंटाईन दिनी बाहुबलीच्या चाहत्यांना विशेष भेट
बाहुबली फेम प्रसिद्ध अभिनेता प्रभास सध्या स्वतःच्या बहुप्रतीक्षित ‘राधे-श्याम’वरून चर्चेत आहे. प्रभासचे चाहते दीर्घकाळापासून हा चित्रपट प्रदर्शित होण्याची प्रतीक्षा करत आहेत. तर आता ‘राधे-श्याम’च्या निर्मात्यांनी चित्रपटाचा एक छोटा प्री टिजर प्रदर्शित केला असून यात ‘लव्हरबॉय’ प्रभासची झलक दिसून येते. प्रदर्शित होताच चित्रपटाचा टीजर समाजमाध्यमांवर चर्चेच्या स्थानी आहे. चित्रपटाचा पूर्ण टीजर 14 फेब्रुवारी म्हणजेच व्हॅलेंटाईन दिनी प्रदर्शित होणार आहे.
प्री टीजरमधील प्रभासच्या लुकला मोठी पसंती मिळत आहे. टीजर प्रदर्शित करत निर्मात्यांनी ‘या व्हॅलेंटाईन दिनी तुम्ही प्रेमाचे साक्षीदार व्हाल’ अशी टिप्पणी जोडली आहे.
जवळपास एक दशकानंतर प्रभासला रोमँटिक भूमिकेत पाहण्याची पर्वणी त्याच्या चाहत्यांना मिळणार आहे. राधेश्याम हा बहुभाषिक चित्रपट असून राधाकृष्ण कुमार यांनी याचे दिग्दर्शन केले असून गुलशन कुमार सतेच टी-सीरिजकडून निर्मिती करण्यात येत आहे. चित्रपटात प्रभास आणि पूजा हेगडे मुख्य भूमिकेत आहेत. तर याचबरोबर सचिन खेडेकर, प्रियदर्शी, भाग्यश्री, मुरली शर्माही यात दिसून येतील.









