वृत्तसंस्था/ मेलबोर्न
येथे मेलबोर्न पार्कवर 8 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱया ऑस्ट्रेलियन ग्रॅण्डस्लॅम टेनिस स्पर्धेत भारताच्या सुमित नागलने पुरुष एकेरीच्या प्रमुख ड्रॉ मध्ये स्थान मिळविले आहे. नागलचा पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीतील सामना लिथुनियाच्या रिकार्डेस बेरानकिस बरोबर होणार आहे.
या स्पर्धेत 2021 च्या हंगामात ऑस्ट्रेलियन ग्रॅण्डस्लॅम टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरी प्रमुख ड्रॉ मध्ये स्थान मिळविणारा सुमित नागल हा भारताचा एकमेव टेनिसपटू आहे. लिथुनियाचा बेरानकिस हा एटीपीच्या क्रमवारीत 72 व्या स्थानावर आहे. गेल्या आठवडय़ात झालेल्या सरावाच्या सामन्यात नागलला बेरानकिसकडून पराभव पत्करावा लागला होता.
एटीपीच्या क्रमवारीत सध्या नागल 139 व्या स्थानावर आहे. वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश मिळविणाऱया नागलने पहिल्या फेरीतील सामना जिंकला तर त्याचा दुसऱया फेरीत रशियाच्या कॅचेनोव्ह किंवा ऑस्ट्रेलियाच्या व्हेकिकशी लढत होईल. ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेच्या पुरुष एकेरीत प्रमुख ड्रॉ मध्ये स्थान मिळविण्याची नागलची ही तिसरी खेप आहे. नागलने 2019 आणि 2020 साली अमेरिकन ग्रॅण्डस्लॅम टेनिस स्पर्धेच्या प्रमुख ड्रॉ मध्ये स्थान मिळविले होते. ऑस्ट्रेलियन ग्रॅण्डस्लॅम टेनिस स्पर्धेत यावेळी पुरुष दुहेरीत भारताचे रोहन बोपण्णा आणि डी. शरण हे आपल्या साथीदारांसमवेत सहभागी होत आहेत.









