कडोली परिसरात निम्म्याहून अधिक गवंडी, बडगी कामगारांना काम बंदमुळे मोठा फटका : शेती व्यवसायालाही मोठी झळ
वार्ताहर / कडोली
कोरोनाच्या महामारीमुळे आलेल्या मंदीने बांधकाम आणि शेती व्यवसायातील शेकडो कामगार, शेतकरी, मजूर आपल्या व्यवसायाला फाटा देऊन आता रोजगार हमी योजनेची वाट धरल्याचे चित्र कडोली परिसरात पहावयास मिळत आहे.
गेल्या वर्षभरापासून कोरोना महामारीने धुमाकूळ घालून सर्व सामान्य नागरिकांना जगणे असहय़ करून सोडले आहे. आता याची झळ कमी असली तरी त्याचे परिणाम मात्र अद्याप सुरूच आहेत. सर्वच व्यवसायात अद्याप मंदीचे सावट दिसून येत आहे. हीच अवस्था कडोली परिसरातील जनतेची झाली आहे. कडोली परिसरात शेती व्यवसाय आणि बांधकाम व्यवसायावर अवलंबून असलेले कामगार वर्ग हे दोन्ही व्यवसाय मंदीत असल्याने नैराश्येत आहेत.
बांधकाम व्यवसाय आर्थिक समस्येने मंदीत आहे. त्यामुळे बहुतांशी ठिकाणी बांधकामे बंद पडली आहेत. त्यामुळे सर्व गवंडी, बडगी मेस्त्राr, कुली कामगारांना पुरेसे काम मिळणे मुश्कील झाले आहे. कडोली परिसरात निम्म्याहून अधिक गवंडी, बडगी कामगारांना काम बंदमुळे मोठा फटका बसला आहे.
शेती व्यवसायालाही झळ
गेल्या दोन-तीन वर्षापासून उत्पादन आणि उत्पादन खर्चाचा ताळमेळ बसत नसल्याने शेतकऱयांना वारंवार आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. कोणत्याही पिकाला योग्य दर मिळत नसल्याने शेतकऱयांत नाराजी दिसत आहे. दराच्या घटीमुळे उभ्या पिकांवर नांगर फिरविण्याची वेळ येत आहे. शिवाय शेत महिला मजूर रोजगार योजनेच्या कामावर जात असल्याने शिवारात मजुरांची टंचाई निर्माण होत आहे. शेती व्यवसाय करायचा कसा? असा प्रश्न शेतकऱयांना पडला आहे. शेती व्यवसायात भरमसाट रुपये खर्च करूनही उत्पादन खर्चही मिळेना. त्यामुळे शेती व्यवसायच पूर्ण धोक्मयात आला आहे.
हे सर्व जाणून घेऊन बांधकाम व्यवसाय आणि शेती व्यवसायातील गवंडी कामगार, शेतकरी यांनी आपला पारंपरिक व्यवसाय थोडासा बाजूला ठेवून रोजगार हमी योजना स्वीकारली आहे. कडोली परिसरातील सर्वसामान्य नागरिकांसाठी रोजगार हमी योजना सोयीस्कर वाटत आहे. कोणताही तोटा न होता कामाचा योग्य मोबदला मिळतो. यातच सर्वांनी धन्यता मानून रोजगाराच्या कामाला जाण्यास सुरुवात केली आहे.
पीडीओंचे प्रशंसनीय कार्य
रोजगार हमी योजनेच्या कामासाठी इच्छुक असलेल्या कामगार, शेतकऱयांचे तातडीने नाव दाखल करून त्यांना काम मिळवून देण्याचे कार्य कडोली ग्राम पंचायतीच्या पीडीओ श्रीमती अश्विनी कुंदर या जलदगतीने करीत असल्याने त्यांचे कामगारवर्गात कौतुक होत आहे. शिवाय सर्व रोहयो कामगारांना जास्तीत जास्त दिवस काम मिळावे हा त्यांचा प्रयत्न आहे. कडोली ग्राम पंचायत क्षेत्रातील कडोली, देवगिरी, जाफरवाडी, गुंजेनहट्टी गावातील एकूण 3 हजार कामगार काम करीत आहेत.
सध्या बेन्नाळीनजीक असलेल्या डोंगर परिसरात पशु-पक्षी आणि प्राण्यांना कायमस्वरुपी पाण्याची उपलब्धता व्हावी, या उद्देशाने पाणी साठण्यासाठी मोठमोठे खड्डे निर्माण करण्याचे काम सुरू आहे. अशा आर्थिक मंदीच्या काळात कडोली ग्राम पंचायत क्षेत्रातील सर्वसामान्य कामगारांना सतत काम मिळवून देण्याचे कार्य पीडीओंनी चालविले आहे. त्यामुळे कामगारवर्गात समाधान व्यक्त होत आहे.