ऑनलाईन टीम / पुणे :
राज्य शासनाने जाहीर केलेल्या कृषीपंप वीजजोडणी धोरण 2020 अंतर्गत पुणे परिमंडलातील प्रामुख्याने कृषिपंपधारकांसह 1 लाख 25 हजार 192 कृषी वीजग्राहकांना थेट लाभ मिळणार आहे. या कृषी ग्राहकांकडे सद्यस्थितीत 921 कोटी 89 लाख रुपयांची एकूण थकबाकी असून त्यामध्ये निर्लेखन, व्याज व दंड माफीचे एकूण 144 कोटी 9 लाख रुपये माफ करण्यात आले आहे. उर्वरित मूळ थकबाकीपैकी 50 टक्के रकमेचा वर्षभरात भरणा केल्यास उर्वरित संपूर्ण थकबाकीचे तब्बल 388 कोटी 90 लाख रुपये माफ करण्यात येणार आहे.
पुणे परिमंडल अंतर्गत मुळशी, वेल्हे, हवेली, जुन्नर, आंबेगाव, मावळ, व खेड तालुक्यांमध्ये 1 लाख 25 हजार 192 कृषी ग्राहक आहेत. या सर्व ग्राहकांकडे व्याज व विलंब आकारासह एकूण 921 कोटी 89 लाख रुपयांची थकबाकी आहे. महावितरणकडून निर्लेखनाद्वारे या कृषिग्राहकांना 41 कोटी 92 लाख रुपयांची सूट मिळाली आहे. तर व्याज व विलंब आकारातील एकूण 102 कोटी 17 लाखांची सूट अशी एकूण 144 कोटी 9 लाखांची सूट देण्यात आली आहे. नव्या धोरणाप्रमाणे या कृषी ग्राहकांकडे आता 777 कोटी 81 लाख रुपयांची मूळ थकबाकी उरली आहे. योजनेनुसार या सर्व कृषी ग्राहकांनी त्यांच्या मूळ थकबाकीच्या 50 टक्के रकमेचा भरणा केल्यास उर्वरित संपूर्ण थकबाकी माफ करण्यात येणार आहे. म्हणजेच येत्या वर्षभरात 1 लाख 25 हजार 192 कृषीग्राहकांनी मूळ थकबाकीच्या 388 कोटी 90 लाख रुपयांचा भरणा केल्यास उर्वरित थकबाकीचे 388 कोटी 90 लाख रुपये माफ करण्यात येणार आहे. मात्र, ज्या ग्राहकांनी या योजनेत दोन किंवा तीन वर्षांसाठी सहभाग घेतला त्यांनी त्या-त्या वर्षी भरलेल्या मूळ थकबाकीच्या रकमेपैकी पहिल्या वर्षी 50 टक्के, दुसऱ्या वर्षी 30 टक्के आणि तिसऱ्या वर्षी 20 टक्के माफ करण्यात येईल. तसेच मूळ थकबाकीचा भरणा करताना चालू वीजबिलांची रक्कम भरणे देखील आवश्यक आहे.
कृषिपंप वीजजोडणी धोरण 2020 मध्ये प्रामुख्याने कृषिपंपासह सर्व उच्च व लघुदाब तसेच उपसा जलसिंचन योजनेतील चालू व कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित झालेल्या कृषी ग्राहकांचा समावेश करण्यात आला आहे. या ग्राहकांच्या 5 वर्षांपूर्वीच्या थकबाकीवरील व्याज व विलंब आकार 100 टक्के माफ करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे कृषी ग्राहकांना संबंधीत वीजबिलांची थकबाकी, माफी व भरावयाची रक्कम आदींचा तपशील महावितरणने https://billcal.mahadiscom.in/agpolicy2020/ या वेबपोर्टलवर मराठी व इंग्रजीमध्ये उपलब्ध करून दिला आहे. केवळ ग्राहक क्रमांक सबमीट केल्यानंतर योजनेतील संबंधीत बिलाचा संपूर्ण तपशील उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी नजिकच्या कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.