सिनेकलाकारांच्या दबावामुळे सरकारने निर्णयात केला बदल : चार आठवडय़ांसाठी नवा आदेश जारी
प्रतिनिधी / बेंगळूर
चित्रपट क्षेत्रातून दबाव आल्याने राज्य सरकारने चित्रपटगृहांमध्ये पूर्ण प्रमाणात म्हणजेच 100 टक्के आसनांसाठी प्रेक्षकांना प्रवेश देण्यास संमती दर्शविली आहे. राज्यातील सर्व चित्रपटगृहांसाठी हा निर्णय लागू असून तो पुढील चार आठवडय़ांपर्यंत जारी राहणार आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी दिली.
केंद्र सरकारने चित्रपटगृहांमध्ये 100 टक्के प्रेक्षकांना प्रवेश देण्याची मुभा देऊन सुद्धा राज्य सरकारने मंगळवारी मार्गसूची जारी करताना राज्यातील चित्रपटगृहांमध्ये एकूण आसन क्षमतेच्या 50 टक्केच प्रेक्षकांना प्रवेश देता येईल, असे स्पष्ट केले होते. याविरोधात चित्रपट निर्माते, सिनेकलाकर, इतर कर्मचाऱयांनी सरकारच्या निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त केली. अभिनेता धुव सर्जा यांनी सकाळीच ट्विटरवर सरकारच्या भूमिकेचे खंडन केले. तर काही जणांनी बाजारपेठ, बसेसमध्ये लोक दाटीवाटीने एकत्र उभे राहतात. मग चित्रपटगृहांच्या बाबतीत सापत्नभाव का?, असा परखड प्रश्न उपस्थित केला. त्यामुळे आरोग्यमंत्री डॉ. सुधाकर यांच्यासह अनेक मंत्र्यांनी याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. त्यानंतर सरकारने चित्रपटगृहांमध्ये 100 टक्के आसनांचा वापर करण्याची परवानगी दिली.
विधानसौधमध्ये बुधवारी ज्येष्ठ अभिनेते, फिल्म चेंबरचे अध्यक्ष, पदाधिकाऱयांची बैठक घेतल्यानंतर आरोग्यमंत्री डॉ. सुधाकर म्हणाले, मुख्यमंत्री येडियुराप्पा यांच्या सूचनेवरून आपण ही बैठक घेतली आहे. कोविड तांत्रिक सल्लागार समितीच्या सल्ल्यानुसार राज्यातील जनतेचे हित विचारात घेऊन चित्रपटगृहांमध्ये 50 टक्के प्रेक्षकांना प्रवेश देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, चित्रपट क्षेत्रातील अनेकांनी या निर्णयाला विरोध केला. चित्रपट निर्माते, कर्मचारी, कलाकारांच्या हिताचा विचार करून सरकारने पाऊल उचलावे अशी विनंती केली आहे. याबाबत चर्चा झाली असून मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार चार आठवडय़ांसाठी पूर्ण प्रमाणात आसनांचा वापर करण्यास चित्रपटगृहांना परवानगी देण्यात आली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
मात्र, कठोर नियम तयार करण्यात आले असून गुरुवारी ते जारी करण्यात येतील. पुढील चार आठवडय़ात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यास निर्णय बदलण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.