वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सार्वजनिक क्षेत्रातील बँका (पीएसबी) कर्जाची वाढती मागणी आणि अन्य गरजा पूर्ण करण्यासाठी चालू आर्थिक वर्ष समाप्त होईपर्यंत दोन महिन्यात समभाग तसेच बॉण्ड यांच्या आधारे जवळपास 10,000 कोटी रुपयांचा निधी उभारणार असून यासाठी योजना आखली जात असल्याचे समजते. मागील काही महिन्यांपासून भारतीय स्टेट बँक, कॅनरा बँक आणि पंजाब नॅशनल बँक यांनी बाजारातून जवळपास 50 हजार कोटी उभे केले आहेत, अशी माहिती आर्थिक सेवा सचिव देबाशीष पांडा यांनी पीटीआयला दिली आहे.
बँकांनी बाजारातून 50,700 कोटी रुपये जमविले होते. तसेच चालू आर्थिक वर्षातील शिल्लक राहिलेल्या महिन्यांमध्ये 8,000 ते 10,000 कोटी रुपये जमा करण्याचे संकेत आहेत. कोरोनाच्या कारणास्तव कर्ज वसूलीत अडचणी जाणवत आहेत. यामुळे बँकांनी काही विषयांमध्ये कर्ज परतावा होत नसल्याची समस्या निर्माण होत असल्याचे स्पष्ट केले आहे. यासाठी पर्यायी मार्ग शोधण्याची गरज असल्याचेही म्हटले जात आहे.









